यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. त्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याला पाचव्या ऍशेस कसोटीत दुखापत झाली होती. पण भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः कमिन्सकडून याबाबत महत्वाचे संकेत दिले गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह वनडे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघ घोषित केला गेला होता. या वनडे संघात पॅट कमिन्स () याला कर्णधार म्हणून सामील केले गेले होते. पण ऍशेस मालिकेतील शेवटच्या सामन्यात कमिन्सला झालेली दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात होते. कमिन्सच्या मनगटाला दुखापत झाली असून यातून सावरण्यासाठी त्याला 6 आठवड्यांचा वेळ लागू शकतो, असे सांगितले गेले होते. याच पार्श्वभूमीवर किमिन्स दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही, जे जवळपास निश्चित झाले होते. पण भारताविरुद्धच्या मालिकेबाबत संभ्रम कायम होता. आता कमिन्सकडून मिळालेले संकेत पाहता तो भारताविरुद्ध खेळण्याची पूर्ण शक्यता आहे.
संघात पुनरागमन करण्याविषयी कमिन्स म्हणाला की, “माजी दुखापत गंभीर नाहीये. मी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पण मला वाटते की, विश्वचषकाआधीच्या काही सामन्यांमध्ये पुनरागमन करणे अधिक योग्य राहील. दुखापत झाली त्या पहिल्या दिवशी खूप वेदना झाल्या होत्या. फलंदाजी करताना वेदना जाणवल्या होत्या.”
दरम्यान, ऍरॉन फिंच याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कमिन्स त्याच्या जागी कसोटी पाठोपाठ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही कर्णधार बनला. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कमिन्सला विश्रांती दिली गेली आहे. अशात मिचेल मार्श टी-20 ऑस्ट्रेलियन संघाचा नवा कर्णधार बनला आहे. ऑस्ट्रेलियाला 30 ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांची मालिका 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर यादरम्यान खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका 22 सप्टेंबर 27 सप्टेंबर यादरम्यान खेळवली जाईल. (Pat Cummins targets India’s ODI Series for his return.)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नेथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह विश्वचषक 2023 साठी ऑस्ट्रेलिनय संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरे, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
महत्वाच्या बातम्या –
स्वातंत्र्यदिन विशेष: 1983 सालचा वर्ल्डकप ते 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण
15 ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय