भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे. भारतानं मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 0-3 अशी गमावली. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या फॉर्मनंही भारतीय संघाची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियात विजयाची हॅट्ट्रिक साधून भारत यावेळी बॉर्डर गावस्कर करंडक कायम राखण्यात यशस्वी ठरेल का, हा मोठा प्रश्न आहे.
दुसरीकडे, विश्वविजेता ऑस्ट्रेलिया भारताचं आव्हान रोखण्यास पूर्णपणे तयार आहे. ते रिषभ पंतसारख्या स्फोटक फलंदाजासाठी खास योजना तयार करत असल्याचा खुलासा कर्णधार पॅट कमिन्सनं केला. याशिवाय त्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मवरही एक मोठं वक्तव्य केलं.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सनं रिषभ पंतबद्दल सांगितलं, “तो नेहमीच खेळाला वेगवान बनवतो. त्यामुळे त्याच्यासारख्या काही खेळाडूंसाठी तुमच्याकडे काही ठोस योजना असायला हव्यात. गेल्या वेळी त्यानं ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केली होती. आम्हाला माहित आहे की जेव्हा तो पुढे जातो तेव्हा तो धोकादायक ठरू शकतो. म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी काही चांगल्या योजना बनवू. आशा करतो की त्या पूर्ण होतील.”
विराट कोहली आणि रोहित शर्माचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या 10 डावांमध्ये दोन्ही फलंदाजांनी मिळून 350 धावाही केलेल्या नाहीत. अशा स्थितीत आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांची कामगिरी कशी होते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोहली आणि रोहितच्या फॉर्मबद्दल कमिन्स म्हणाला, “प्रत्येक खेळाडू चांगल्या आणि वाईट फॉर्ममधून जातो. जर तुमची कसोटी कारकीर्द लांब असेल तर तुम्हाला काही किरकोळ चढ-उतार दिसतील. आमचं काम भारतीय फलंदाजांना शक्य तितकं शांत ठेवणं आहे. हे दोघेही भारतातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी आहेत. त्यामुळे काय होते ते आम्ही पाहू.”
हेही वाचा –
विदेशी भूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाची बलाढ्य कामगिरी; पाहा आकडेवारी
चक्क आपल्याच कर्णधाराशी भिडला हा खेळाडू, लाईव्ह सामन्यात ‘तू-तू मैं-मैं’, पाहा VIDEO
IND VS AUS; भारताला मिळाला नवा कसोटी सलामीवीर? रोहितच्या जागी करु शकतो ओपनिंग