आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेचा थरार सुरू आहे. बुधवार रोजी (०१ सप्टेंबर) उभयंतांमध्ये ब्रिडी क्रिकेट क्लब स्टेडियमवर तिसरा टी२० सामना पार पडला. आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंग याने या सामन्यात चिवट झुंज देत शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीमुळे आयर्लंडने ४० धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मात्र या शतकासह एक नको असलेला विक्रमही त्याच्या खात्यात जमा झाला आहे.
स्टर्लिंगने डावाखेर नाबाद राहत ७५ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ८ षटकार खेचत ११५ धावा केल्या. दरम्यान ७० चेंडूंमध्येच त्याचे शतक पूर्ण झाले. २००९ मध्ये टी२० कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्टर्लिंगला अखेर आपल्या ८४ व्या सामन्यात शतक करण्यात यश आले. पण हे पहिलेवहिले शतक झळकावत त्याने नकोशा विक्रमातही अव्वलस्थानी उडी घेतली. त्याचे हे शतक टी२० क्रिकेट इतिहासातील सर्वात हळूवार शतक ठरले आणि तो सर्वात मंदगतीने टी२० शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
यापूर्वी टी२० क्रिकेटमध्ये हा नकोसा विक्रम न्यूझीलंडच्या विस्फोटक फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर होता. २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ६९ चेंडूंचा सामना करताना त्याने ही नकोशी कामगिरी केली होती. परंतु आता ९ वर्षांनंतर स्टर्लिंगने त्याला पछाडत आपल्या नावे सर्वात हळूवार शतकाची नोंद करुन घेतली आहे.
भलेही हा नकोसा विक्रम स्टर्लिंगच्या पारड्यात पडला असेल, परंतु त्याने एक प्रशंसनीय अशी किमयाही साधली आहे. तो टी२० स्वरुपात शतक करणारा आयर्लंडचा केवळ दुसराच फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी दिग्गज अष्टपैलू केविन ओब्रायन हा आयर्लंडचा पहिला शतकवीर ठरला आहे.
दरम्यान स्टर्लिंगच्या ११५ धावांव्यतिरिक्त आयर्लंडचा कर्णधार एँड्र्यू बालबिर्नी यानेही ३१ धावा केल्या. तसेच शेन गेटकेटनेही नाबाद १९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे आयर्लंडचा संघ निर्धारित २० षटकात २ विकेट्स गमावून १७८ धावा करू शकला. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा समाचार घेत संघाचा विजय निर्धारित केला. केवळ झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग ओव्हरटन (३३ धावा) ३० धावांचा पल्ला ओलांडू शकला. उरलेला एकही फलंदाज साजेशी खेळी करू शकला नाही आणि १८.२ षटकातच आयर्लंडने सामना जिंकला.
आयर्लंडकडून मार्क अडैरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जोशुवा लिटल, शेन गेटकेट आणि बेनजामिन व्हाईट यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान
गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!
टी२० विश्वचषकासाठी ‘या’ दिवशी निवडली जाणार ‘विराटसेना’; १५ सदस्यीय संघात कोणाची लागेल वर्णी?