वराझदीन (क्रोएशिया): भारताचे युवा टेबल टेनिस खेळाडू पायस जैन आणि विश्वा दिनादयालन जोडीने क्रोएशिया ज्युनियर, कॅडेट ओपन स्पर्धेमध्ये मुलांच्या कॅडेट सांघिक गटात कांस्यपदक मिळवले.
पायस व विश्वा यांच्या समोर क्रोएशिया, चेक प्रजासत्तक-इजिप्त आणि चिली-मेक्सिको यांचे आव्हान होते. त्यांनी चांगली कामगिरी करत या सर्व संघांविरुद्ध 3-0 असे विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले.
उपांत्यपुर्व फेरीत हंगेरी विरुद्धच्या सामन्यात विश्वाला एकेरीत माटे ओक्साईविरुद्ध 0-3 असे पराभूत व्हावे लागले. पण, पायस जैनने एरिक हुझ्सवारवर 3-0 असा विजय मिळवला. आपल्या दुहेरीच्या सामन्यात जोडीने 3-0 असा विजय नोंदवत आघाडी घेतली.
पुढच्या एकेरीच्या सामन्यात पासला माटे ओस्काईकडून 2-3 असे पराभूत व्हावे लागले. विश्वाने पुढच्या एकेरीच्या लढतीत एरिझ हुझ्सवारला 3-2 असे नमवित उपांत्यफेरी गाठली. उपांत्यफेरीत भारताची गाठ चीनच्या संघाशी होती. पण, त्यांना चीनकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अन्य गटात पायस जैन (कॅडेट मुले), रिगन अल्बुरक्युरेक्यु व मनुष शाह (ज्युनियर मुले दुहेरी), दिया चितळे व स्वस्तिका घोष ( ज्युनियर मुली दुहेरी) आणि विश्वा व पायस (ज्युनियर मुले दुहेरी) यांना उपांत्यपुर्व फेरीच्या पुढे जाता आले नाही.