महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचवा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. दुपारच्या सत्रात झालेल्या या सामन्यात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने उत्कृष्ट संगीत कामगिरी करत स्पर्धेत विजयाने सुरुवात केली. तर, रत्नागिरी जेट्सला हंगामातील सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.
गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ चार धावांमध्ये माघारी परतले. रजनीश गुरबानी व आत्मन पोरे यांनी रत्नागिरी संघाला जोरदार हादरे दिले. संघ अडचणीत असताना कर्णधार अझीम काझी व दिव्यांग हिंगणेकर यांनी जबाबदारी उचलली. दोघांनी कोणतेही दडपण न घेता आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवली. दोघांनी 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. केवळ 26 चेंडूत 58 धावा करणाऱ्या दिव्यांग याने अथर्व डाकवे याच्या एकाच षटकात पाच षटकार मारण्याची कामगिरी केली.
दिव्यांग बाद झाल्यानंतर अझीम हा देखील 47 धावांचे योगदान देऊन तंबूत परतला. यष्टीरक्षक निखिल नाईक याने 40 धावा बनवत संघाला 170 चा टप्पा पार करून दिला. पीबीजी कोल्हापूर टस्कर्ससाठी आत्मन पोरे याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर, श्रेयस चव्हाण यांना दोघांना तंबूचा रस्ता दाखवला.
विजयासाठी मिळालेले 174 धावांचा पाठलाग करताना अनुभवी अंकित बावणे व कर्णधार राहुल त्रिपाठी यांनी 5 षटकात अर्धशतकी भागीदारी रचली. त्रिपाठीने 18 चेंडू 32 धावांचे योगदान दिले. त्यानंतर बावणे याच्या जोडीला आलेल्या युवा सचिन धस याने देखील दमदार फलंदाजी करत 35 धावा कुटल्या. दुसऱ्या बाजूने अंकित याने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक करताच अंकित बाद झाला. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे याने आणखी पडझड होऊ न देता 14 चेंडूंमध्ये नाबाद 35 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. रत्नागिरीसाठी दिव्यांग हिंगणेकर याने दोन बळी मिळवले. तर, आत्मान पोरे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.






