इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाचा तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान दुबई येथे होईल. गुणतालिकेत अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी असलेल्या या दोन्ही संघांचा प्रयत्न विजय मिळवून आपले स्थान सुधारण्यावर असेल. आज आपण या दोन्ही संघांतील आजवरची एकमेकाविरुद्धची कामगिरी कशी राहिली आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
इतक्या वेळा आले दोन्ही संघ आमनेसामने
आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता असलेला राजस्थान रॉयल्स संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. प्रमुख विदेशी खेळाडू या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार नसल्याने राजस्थानची चिंता वाढली आहे. त्यामुळे, दुसऱ्या टप्प्याचा विजयी प्रारंभ करण्याचा प्रयत्न कर्णधार संजू सॅमसन याचा राहील.
दुसरीकडे भारताचा प्रमुख सलामीवीर केएल राहुल याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्सची कामगिरी यावर्षी देखील समाधानकारक राहिली नाही. पहिल्या टप्प्यात त्यांना काही नजीकच्या सामन्यांत पराभव पत्करावा लागला. कर्णधार राहुल हा या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करेल.
उभय संघांमध्ये आत्तापर्यंत २२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १२ सामन्यांमध्ये राजस्थानने तर, दहा सामन्यात पंजाबने विजय मिळवला आहे. हे दोन्ही संघ साखळी फेरी व्यतिरिक्त कधीही प्ले ऑफमध्ये एकमेकाविरुद्ध खेळले नाहीत.
पहिल्या टप्प्यात पंजाबने मिळवला रोमांचक विजय
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात ज्यावेळी हे दोन्ही संघ समोरासमोर आले होते तेव्हा पंजाबने अखेरच्या चेंडूवर चार धावांनी विजय साजरा केला होता. कर्णधार राहुलच्या ९१ धावांच्या जोरावर पंजाबने राजस्थानसमोर २२२ धावांचे लक्ष ठेवले होते. प्रत्युत्तरात, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने ११९ धावांची खेळी करत विजय आवाक्यात आणला होता. मात्र, अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना तो षटकार मारण्याच्या नादात बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला बघावी लागेल वाट? राजस्थानविरुद्ध ‘असा’ असेल पंजाबचा संघ
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित उतरणार राजस्थान रॉयल्स, पाहा संजूच्या संघाची ‘संभाव्य प्लेइंग इलेव्हन’
हे काय? धावबाद झाल्याने संतप्त फलंदाजाने सहकाऱ्यालाच फेकून मारली बॅट, व्हिडिओची चर्चा





