शिखर धवनचे संयमी अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ, यामुळे दिल्ली कॅपिटल्सने आज झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला. पंजाबने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य दिल्लीने १७.४ षटकातच ३ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. यासह हा सामना खिशात तर त्यांनी घातलाच. मात्र यंदाच्या हंगामातील हा सहावा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थानी देखील झेप घेतली.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीने पुन्हा आपली ताकद दाखवून दिली. पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉने ६ षटकातच ६३ धावांची सलामी दिली होती. ७व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पृथ्वी शॉ हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यांनतर धवनने दिल्लीच्या डावाची कमान सांभाळली.
त्याने दुसऱ्या विकेटसाठी स्टीव्ह स्मिथसह ४८ धावांची तर तिसऱ्या विकेटसाठी रिषभ पंतसह ३६ धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. धवनने या डावात ४७ चेंडूत नाबाद ६७ धावांची खेळी केली. अखेरीस शिम्रॉन हेटमायरने ४ चेंडूत १६ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन, हरप्रीत ब्रार आणि रायले मेरीडीथ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पंजाबने दिल्लीला दिले होते १६७ धावांचे लक्ष्य
तत्पूर्वी, पंजाबने या सामन्यात दिल्लीला १६७ धावांचे आव्हान दिले होते. पंजाब कडून मयंक वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मयंकने ५८ चेंडूत नाबाद ९९ धावा काढल्या होत्या. तर त्याव्यतिरिक्त केवळ डेव्हिड मलानने २६ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कॅगिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
गोंधळच गोंधळ! विकेट वाचवण्याच्या नादात दोन्ही फलंदाज धावले एकाच एंडला, पाहा व्हिडिओ
व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल
राजस्थान संघांसाठी असा रॉयल कारनामा करणारा जोस बटलर ठरला तिसराच परदेशी






