इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १६ वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर ८ एप्रिलला खेळला गेला. या सामन्यात शुबमन गिल आणि राहुल तेवातिया यांच्या दमदार खेळीच्या मदतीने गुजरातने हा सामना ६ विकेट्सने जिंकला. या सामन्यात शुबमन गिलने (Shubhman Gill) ९६ धावा केल्या, मात्र, ४ धावांनी त्याचे शतक हुकले. त्याला त्याच्या शानदार खेळीमुळे सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर त्याने त्याचे मत मांडले आहे.
सामन्यानंतर गुजरातचा सलामी फलंदाज शुबमन गिल म्हणाला, क्रीजवर त्याचे टिकणे गरजेचे होते, कारण कधी कधी मोठे शाॅट खेळले जातात आणि सामन्यात असेच झाले. सामनावीर झाल्यानंतर तो म्हणाला, “धावा करणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. या मैदानाची आउट फिल्ड खुप वेगवान होती आणि लक्ष्य गाठण्यासाठी सलग चेंडू सीमारेषे पार घालवणे खूप गरजेचे होते.”
शुबमन म्हणाला, “सलामीवीर म्हणून मला डावादरम्यान उत्तम फलंदाजी करावी लागते, म्हणजे मोठे शाॅटसाठी शेवटी खेळणे सोपे व्हावे. काही दिवस असे असतात, तेव्हा मोठे शाॅट्स खेळले जातात. आज मी मोठे शाॅट खेळलो आणि पूर्ण ताकदीने खेळलो. नेट्समध्ये सराव करताना माझा प्रयत्न असतो की, निर्धाव चेंडू कमी खेळावेत आणि यामध्ये मी यशस्वी ठरलो आहे.”
या सामन्यात हार्दिकने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सकडून लियाम लिविंगस्टोनच्या अर्धशतकाच्या मदतीने २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या. राशिद खानने ३ विकेट्स घेतल्या. गुजरातने २० षटकात ४ विकेट्स गमावत १९० धावा करत हा सामना ६ विकेट्सने जिंकला. तेवातियाने शेवटच्या षटकात पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला.