दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी (२१ सप्टेंबर) झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने २ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या ४ चेंडूत ३ धावांची गरज असताना पंजाबने २ विकेट्स गमावल्या आणि एकही धाव काढली नाही.
या सामन्यात १८६ धावांचे आव्हान राजस्थानने पंजाबसमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला ४ बाद १८३ धावाच करता आल्या. पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर, केएल राहुलने ४९ धावा केल्या. तसेच एडेन मार्करमने नाबाद २६ धावा केल्या आणि निकोलस पूरनने ३२ धावा केल्या. राजस्थानकडून कार्तिक त्यागीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच चेतन साकारिया आणि राहुल तेवातियाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मयंक-केएलची शतकी भागीदारी व्यर्थ
पंजाबकडून १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांची जोडी उतरली. या दोघांनीही पंजाबला दमदार सुरुवात करुन दिली. सुरुवातीपासूनच मयंक आणि केएल राहुलने आक्रमक पवित्रा स्विकारला होता. मयंकने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने २००० आयपीएल धावा पूर्ण केल्या.
दरम्यान, केएल राहुलला या सामन्यादरम्यान तब्बल ३ जीवदान मिळाले. पण याचा त्याने फायदा घेत मयंकसह शतकी भागीदारी रचली. याबरोबरच ३००० आयपीएल धावा पूर्ण केल्या. त्याने ८० डावात हा पल्ला गाठला. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय ठरला. त्याला १२ व्या षटकात चेतन साकारियाने ४९ धावांवर कार्तिक त्यागीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे त्याचे अर्धशतक केवळ १ धावेने हुकले. त्यामुळे केएल राहुल आणि मयंक यांची १२० धावांची भागीदारी तुटली.
त्याच्यापोठोपाठ १३ व्या षटकांत मयंकला राहुल तेवतियाने बाद करत पंजाबला दुसरा धक्का दिला. मयंकने ४३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली. यानंतर निकोलस पूरन आणि एडेन मार्करम यांनी डाव सावरला आणि पंजाबला विजयाच्या दिशेने नेले होते.
अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ४ धावांची गरज होती. हे षटक राजस्थानकडून कार्तिक त्यागी टाकत होता. त्याने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पूरनला बाद करत सामन्यात रोमांच उभा केली. पूरन २२ चेंडूत ३२ धावा करुन बाद झाला. यानंतरचा चेंडू निर्धाव गेला. तर पाचव्या चेंडूवर दीपक हुडा बाद झाला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना पंजाबला एकही धाव करता आली नाही त्यामुळे राजस्थानने हा सामना २ धावांनी जिंकला.
पंजाबसमोर १८६ धावांचे आव्हान
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने २० षटकात सर्वबाद १८५ धावा केल्या. त्यामुळे आता पंजाबसमोर १८६ धावांचे आव्हान आहे.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. तसेच महिपाल लोमरोरने ४३ आणि एविन लुईने ३६ धावांची आक्रमक खेळी केली. तर, पंजाबकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या, तर इशान पोरेल आणि हरप्रीत ब्रारने प्रत्येकी १ विकेट घेतली.
अर्शदीपच्या ५ विकेट्स
या सामन्यात पंबाज किंग्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजस्थान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. राजस्थानकडून एविन लुईस आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला फलंदाजी केली. या दोघांनीही संघाला दमदार सुरुवात करुन दिली. लुईसने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळायला सुरुवात केली होती. तर, दुसऱ्या बाजूने जयस्वाल त्याला साथ देत होता. या दोघांनी अर्धशतकी भागीदारीही रचली.
पण अखेर ६ व्या षटकात लुईसला अर्शदीप सिंगने मयंर अगरवालकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे त्याची आणि जयस्वालची ५४ धावांची भागीदारी तुटली. लुईसने २१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ३६ धावा केल्या. त्याच्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार संजू सॅमसन फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याला पदार्पणवीर इशान पोरेलने ४ धावांवर ८ व्या षटकात बाद केले.
यानंतर जयस्वालला लियाम लिव्हिंगटनने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, तो तुफानी खेळ करण्याच्या नादात १७ चेंडूत २५ धावा करुन १२ व्या षटकात बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. त्याने जयस्वालसह ४८ धावांची भागीदारी केली. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले.
त्यानंतरही जयस्वाल चांगल्या लयीत खेळत होता. त्यामुळे तो त्याचे पहिले आयपीएल अर्धशतक करेल असे वाटत होते. मात्र, तो अर्धशतकापासून केवळ १ धाव दूर असताना हरप्रीत ब्रारने त्याला मयंक अगरवालकरवी झेलबाद केले. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारासंह ४९ धावा केल्या.
यानंतर राजस्थानने नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या. मात्र, असे असताना महिपाल लोमरोरने तुफानी खेळी करत राजस्थानच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. त्याने १६ व्या षटकात २४ धावा चोपल्या. पण त्यानंतर १७ व्या षटकात रियान परागला ४ धावांवर मोहम्मद शमीने बाद केले. १८ व्या षटकात लोमरोर देखील अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार मारत ४३ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर १९ व्या षटकात राहुल तेवतिया आणि ख्रिस मॉरीस यांना शमीने बाद करत दुहेरी धक्का दिला.
यानंतरही अखेरच्या षटकात कार्तिक त्यागी आणि चेतन सकारीया यांना बाद करत अर्शदीपने ५ विकेट्स पूर्ण केल्या. अखेर राजस्थानने २० षटकांअखेर सर्वबाद १८५ धावा केल्या.
तीन खेळाडूंचे आयपीएल पदार्पण
या सामन्यातून पंजाब संघाकडून इशान पोरेल, एडेन मार्करम आणि आदिल राशिद आयपीएल पदार्पण करत आहेत. या तिघांनाही पंजाबने अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. मात्र, बर्थडे बॉय ख्रिस गेल या सामन्याला मुकणार आहे.
तसेच राजस्थान रॉयल्स संघासाठी एविन लुईसने पदार्पण केले आहे. हा त्याचा राजस्थानसाठी आयपीएलमधील पहिलाच सामना असेल. लुईस शिवाय, लियाम लिव्हिंगटन, ख्रिस मॉरिस आणि मुस्तफिजूर हे परदेशी खेळाडू या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या राजस्थान संघात आहेत.
असे आहेत ११ जणांचे संघ –
पंजाब किंग्ज: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मयंक अगरवाल, एडेन मार्करम, निकोलस पूरन, दीपक हुडा, फॅबियन ऍलन, इशान पोरेल, आदिल रशिद, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, एविन लुईस, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी.