आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात होणार आहे. वृत्तानुसार, हा मेगा इव्हेंट 19 फेब्रुवारीला सुरू होऊन अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. मात्र, स्पर्धेसाठी भारत पाकिस्तानात जाणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नाही.
अलीकडेच एक अहवाल समोर आला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि बीसीसीआय आयसीसीकडे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारावर आयोजित करण्याची मागणी करेल. मात्र आता या मुद्द्यावर पाकिस्तानकडून मोठं वक्तव्य समोर येत आहे.
पाकिस्तानातील ‘जिओ न्यूज उर्दू’च्या रिपोर्टनुसार, पीसीबीनं बीसीसीआयला धमकी दिली आहे की, जर भारतानं पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही, तर ते 2026 च्या टी20 विश्वचषकावर बहिष्कार टाकतील. 2026 टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करत आहे.
रविवारी, 14 जुलै रोजी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याच्या भूमिकेपासून मागे हटणार नाही. आयसीसीच्या बैठकीतही बोर्ड याच भूमिकेवर ठाम राहील. ही बैठक 19 ते 22 जुलै दरम्यान कोलंबोमध्ये होणार आहे. या बैठकीला पीसीबीचे चेअरमन मोहसिन नक्वी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याच्या भूमिकेपासून पीसीबी मागे हटणार नाही आणि बोर्ड संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यावर ठाम राहील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
भारतानं अखेरचा पाकिस्तान दौरा जुलै 2008 मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी केला होता. गेल्या 16 वर्षात पाकिस्तानचा संघ 4 वेळा भारतात आला आहे. पाकिस्तानचा संघ 2011 एकदिवसीय विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. यानंतर 2012-13 मध्ये पाकिस्ताननं द्विपक्षीय मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. याशिवाय संघ 2016 टी20 विश्वचषक आणि 2023 विश्वचषकासाठीही भारतात आला होता.
गतवर्षी आशिया चषकासाठी भारताला पाकिस्तानचा दौरा करायचा होता. मात्र बीसीसीआयच्या कठोर भूमिकेनंतर ही स्पर्धा संकरित मॉडेलच्या आधारे खेळवण्यात आली. यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीसह भारताचे सर्व सामने श्रीलंकेत हलवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
युवा ब्रिगेडचा दरारा! शुबमन गिलच्या संघानं झिम्बाब्वेला नाचवलं, मालिका 4-1 ने खिशात
काय सांगता! एका चेंडूत 13 धावा ठोकल्या…!! टी20 क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
अभिषेक शर्मा समोर सर्वजण फेल, पदार्पणाच्या टी20 मालिकेतच केला महान विक्रम, ठरला भारताचा पहिला खेळाडू