अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणेच कुस्तीलाही कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे मानाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार की नाही याबाबद अनेकांना प्रश्न पडला होता. पण आता महाराष्ट्र केसरी किताब लढत आणि ६४व्या वरिष्ठ गट गादी व माती राज्यस्तरीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनास महाराष्ट्र राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
कोरोनाचे संकट असले तरी नियमांचे पालन करुन ही स्पर्धा आयोजित व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेने भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून आता ही स्पर्धा पुढील महिन्यात पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात होण्याची शक्यता आहे. असे झाले तर पुण्याला १३ व्यांदा मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धचे आयोजन करण्याची संधी मिळेल.
नियामांचे करावे लागेल पालन –
महाराष्ट्र शासनाने जरी या स्पर्धेच्या आयोजनास परवानगी दिली असली तरी कोविड-१९ संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटींचे आयोजनावेळी पालन करावे लागणार आहे. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत, यात सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, थर्मल स्कॅनिंग करणे यांसारख्या अटींचा समावेश आहे.
याबरोबरच आत्तापर्यंत नेहमीच या स्पर्धेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेता या स्पर्धच्या प्रेक्षक संख्येवर मर्यादा घातली जाऊ शकते.