मुंबई । वेस्ट इंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी संघाच्या फलंदाजीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. शाई होप आणि जॉन कॅम्पबेल फलंदाजांच्या निकृष्ट कामगिरीमुळे सिमन्स चिंतेत आहेत.
वेस्ट इंडिज संघाला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात 113 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वेस्ट इंडिजने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. 3 सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे.
मागील दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात कॅम्पबेलने अवघ्या 52 धावा केल्या आहेत, तर शाई होपने चार डावांमध्ये केवळ 57 धावा काढल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शाई होपचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत मालिकेच्या शेवटच्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज संघातून वगळले जाऊ शकतात.
ते म्हणाले, “कॅम्पबेल आणि होपच्या फॉर्मवर पुढील काही दिवसांत चर्चा करायची आहे आणि आपण त्यांच्याबरोबर पुढे जाऊ की नाही याविषयी निर्णय घ्यावा लागेल.”
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना फिल सिमन्स म्हणाले की, “आम्ही या कसोटीत पाच-सहा अर्धशतके ठोकली आहेत आणि कोणीही त्याचे शतकात रूपांतर केले नाही. कॅरेबियन संघातील फलंदाजांनी त्यांच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. त्यांच्या लहान धावसंख्या मोठ्या धावांमध्ये रूपांतरित करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचेही सिमन्स यांनी म्हटले आहे.”
“आमच्या फलंदाजांनी पुढे जाऊन मोठी शतके ठोकणे महत्त्वाचे आहे. बेन स्टोक्सने 176 आणि डॉम सिब्ली याने 120 धावा केल्या. आमच्या फलंदाजांनाही शतक ठोकण्याची गरज आहे, कारण आमचे गोलंदाज त्यांचे काम करतात. आता वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी फलंदाजांना उभे राहण्याची गरज आहे,” असे फिल सिमन्स यांनी नमूद केले.
शाई होपच्या कामगिरीवर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले, ”शाई होपचा परफॉर्मन्स पाहून मी चिंतीत आहे. त्याने मागील चार डावात मोठ्या धावा केल्या नाहीत. वनडे आणि टी 20मध्ये दमदार कामगिरी करणारा होप कसोटीमध्ये धावा करण्यासाठी झगडत आहे. पुढील दोन दिवसांत मी त्याच्यासोबत बसून चर्चा करणार असल्याचेही सिमन्स यांनी सांगितले.”






