अबुधाबी। शुक्रवारी (८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ५५ वा सामना पार पडला. शेख जायेद स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबईने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीमुळे ४२ धावांनी विजय मिळवला. याच सामन्यात फिरकीपटू पियुष चावलाने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज
शुक्रवारी पियुष चावलाने मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ३८ धावा देत १ विकेट घेतली. त्याने हैदराबादच्या मोहम्मद नबीला बाद केले. या विकेटसह चावला टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.
त्याने आत्तापर्यंत भारत, गुजरात, उत्तर प्रदेश, चेन्नई सुपर किंग्स, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि ससेक्स अशा संघांसाठी मिळून २५० टी२० सामने खेळताना २४.५३ च्या सरासरीने २६३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याने अमित मिश्राच्या २६२ टी२० विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले.
टी२० क्रिकेट प्रकारामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
२६३ विकेट्स – पियुष चावला (२५० सामने)
२६२ विकेट्स – अमित मिश्रा (२३६ सामने)
२५३ विकेट्स – आर अश्विन (२५८ सामने)
२३९ विकेट्स – युजवेंद्र चहल (२१४ सामने)
२३५ विकेट्स – हरभजन सिंग (२६८ सामने)
आयपीएलमध्ये चौथ्या क्रमांकावर
चावलाने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १६५ सामने खेळले असून २७.३९ च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमाकंवार आहे.
या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे लसिथ मलिंगा (१७० विकेट्स), अमित मिश्रा (१६६ विकेट्स) आणि ड्वेन ब्रावो (१६५ विकेट्स) हे गोलंदाज आहेत. तर, चावला पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर १५० विकेट्ससह हरभजन सिंग आहे. विशेष म्हणजे या ५ जणांनाच आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेता आल्या आहेत.
मुंबईने सामना जिंकला
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला इशान आणि सूर्यकुमारने योग्य न्याय देत आक्रमक फलंदाजी केली. इशानने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने ४० चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त बाकी प्रमुख फलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मुंबईने २० षटकांत ९ बाद २३५ धावा केल्या. हैदराबादकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादला २० षटकात ८ बाद १९३ धावाच करता आल्या. हैदराबादकडून प्रभारी कर्णधार मनीष पांडेने ४१ चेंडूत नाबाद ६९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच जेसन रॉयने ३४ आणि अभिषेक शर्माने ३३ धावा केल्या, तर रियान परागने २९ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त कोणालाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराह, नॅथन कुल्टर-नाईल आणि जिमी निशामने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र
टी२० विश्वचषकात यंदा पहिल्यांदाच घडणार ‘या’ ५ गोष्टी
शोएब मलिकचा टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात समावेश, ‘या’ खेळाडूऐवजी मिळाले स्थान