विशाखापट्टणम, ३ सप्टेंबर २०२५: प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या १२ व्या हंगामातील ११ वा सामना पुणेरी पलटन आणि बंगाल वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पुणेरी पलटनकडून अस्लम इनामदार आणि आदित्य शिंदे चमकले. पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सला ४५-३६ ने पराभूत करत दमदार विजयाची नोंद केली. हा पुणेरी पलटनचा या हंगामातील सलग तिसरा विजय ठरला.
विशाखापट्टणमच्या विश्वनाध स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडलेल्या सामन्यात पुणेरी पलटनकडून कर्णधार अस्लम इनामदार आणि आदित्य शिंदे यांनी प्रत्येकी ११-११ गुणांची कमाई केली. बंगाल वॉरियर्सकडून देवांकने १७ गुणांची कमाई केली. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही.
पुणेरी पलटन संघाकडून अस्लम इनामदारने पहिल्याच चढाईत दमदार सुरूवात करून देत १ गुण घेतला. तर बंगाल वॉरियर्सकडून देवांकने पहिल्याच चढाईत २ गुण घेत दमदार सुरूवात केली. अस्लमने सुरूवातीच्या दोन्ही चढाईत गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या चढाईत पुणेरी पलटनला देंवाकला बाहेर बसवण्यात यश आलं. पुर्वार्धातील पाचव्या मिनिटाला अस्लम इनामदारने सुपर रेड करत ७-५ ने आघाडी मिळवून दिली. सहाव्या मिनिटाला दोन्ही संघांचे गुण ७-७ ने बरोबरीत आले. पुर्वार्धातील सुरूवातीच्या १० मिनिटात पुणेरी पलटनकडून अस्लमने दमदार सुरूवात केली. त्यानंतर त्याला आदित्य आणि पंकजची चांगली साथ मिळाली.
पुर्वार्धातील १० व्या मिनिटाला पुणेरी पलटनने बंगाल वॉरियर्सवर पहिला लोन चढवला. देवांकने गुण घेण्याचा प्रयत्न केला. पण गौरव खत्रीने त्याची पकड करत बंगाल वॉरियर्सला ऑलआऊट करत १६-१० ने आघाडी मिळवली. पुर्वार्धातील शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना पुणेरी पलटनवर ऑलआऊटचं संकट होतं. एकटा अस्लम इनामदार शिल्लक राहिला होता. त्यावेळी त्याने चढाईत २ गुणांची कमाई केली आणि बचाव करताना विशाल भारद्वाजने सुपर टॅकल करत ४ गुणांची आघाडी कायम ठेवली. पुर्वार्धातील शेवटचे २ मिनिटे शिल्लक असताना पुणेरी पलटनचा संघ पहिल्यांदा ऑलआऊट झाला. पुर्वार्धाच्या समाप्तीपर्यंत पुणेरी पलटनने २६-२२ सह ४ गुणांची आघाडी घेतली.
उत्तरार्धातही बंगालचा सर्वात यशस्वी चढाईपटू देवांक बराच वळ मैदानावर होता. याचा बंगाल वॉरियर्सला चांगलाच फटका बसला. उत्तरार्धातील ७ व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचा संघ पुन्हा एकदा ऑलआऊट झाला. यासह ३४-२४ गुणांसह १० गुणांची भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धातील ८ व्या मिनिटाला आदित्य शिंदेने आपलं सुपर १० पूर्ण केलं. पूर्वार्धात शांत राहिलेल्या देवांकने उत्तरार्धात लागोपाठ गुणांची कमाई केली.
शेवटच्या ५ मिनिटात पुणेरी पलटनकडे १० गुणांची आघाडी होती. या सामन्यातही देवांकने दमदार कामगिरी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हा सामना पुणेरी पलटनने ४५-३६ ने आपल्या नावावर केला.






