प्रो कबड्डी लीगच्या १२५ व्या सामन्यात बेंगलोर बुल्स व हरियाणा स्टीलर्स संघ समोरासमोर आले. प्ले ऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात बेंगलोर बुल्सने अप्रतिम कामगिरी करत विजय मिळवला. यासह संघाने प्ले ऑफसाठी पात्र होण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
या सामन्याची सुरुवात बेंगलोर संघासाठी अपेक्षित कशी झाली. कर्णधार पवन सेहरावत याने सलग गुण घेत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याच वेळी संघाच्या डिफेन्सने हरियाणा संघाला तब्बल १७ मिनिटे पहिला रेडींग गुण घेण्यासाठी झुंजवले. पहिल्या हाफमध्ये सर्व डिफेन्सने कमीत कमी एक गुण मिळवला होता. तर, पवन व भरत यांनी प्रत्येकी सहा गुणांचे योगदान दिले होते. पहिल्या हाफमध्ये बेंगलोर २०-१४ असा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा एकदा बेंगलोर संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. त्यांनी पहिल्या पाच मिनिटात दुसऱ्यांदा हरियाणा संघाला ऑल आउट केले. त्यानंतर मात्र हरियाणा संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी झटपट गुण घेत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. बेंगलोरचा कर्णधार पवन सेहरावत याने रेडींगसह डिफेन्समध्ये ही उपयुक्त योगदान दिले. अखेरच्या चार मिनिटात बेंगलोरकडे १२ गुणांची आघाडी होती. त्यानंतरही पवनचा झंझावात थांबला नाही. त्याने सुपर टेन व हाय-फाईव्ह करत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. अखेरीस बेंगलोरने ४६-२४ असा विजय संपादन केला.