पुणे। भारत विरुद्ध विंडीज संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. पण विंडीजने या सामन्यात 43 धावांची विजय मिळवला. त्यामुळे त्याची ही एकाकी लढत व्यर्थ ठरली.
असे असले तरी मात्र विराटने एक खास विक्रम केला आहे. विराटने या सामन्यात 10 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने 119 चेंडूत 107 धावा केल्या. याबरोबरच त्याने भारतात खेळताना 8000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे.
याआधी हा टप्पा फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविडने पूर्ण केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक धावा या तेंडुलकरने केल्या आहे. त्याने भारतात खेळताना 258 सामन्यात 50.32 च्या सरासरीने 14192 धावा केल्या आहेत. यात त्याने 42 शतके आणि 70 अर्धशतके केली आहेत.
त्याच्या पाठोपाठ राहुल द्रविडने 167 सामन्यात 21 शतके आणि 51 अर्धशतकांसह 47.89 च्या सरासरीने 9004 धावा केल्या आहेत. भारतामध्ये 9 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा फक्त तेंडुलकर आणि द्रविडला पार करता आला आहे.
त्याचबरोबर विराटने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना आत्तापर्यंत 138 सामन्यात 60.47 च्या सरासरीने 8043 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 28 शतकांचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
14192 – सचिन तेंडुलकर
9004 – राहुल द्रविड
8043 – विराट कोहली
7796 – विरेंद्र सेहवाग
7398 – एमएस धोनी
महत्त्वाच्या बातम्या:
–असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू
–भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो