भारतात क्रिकेटची पंढरी म्हणून वानखेडे स्टेडियमकडे पाहिले जाते. अनेक खेळाडू याच स्टेडियमवर प्रथम श्रेणी सामने खेळून पुढे भारतीय संघात दाखल झाले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही आपला शेवटचा कसोटी सामना याच स्टेडियमवर खेळला.
भारत काय जगभरातील क्रिकेटप्रेमी वानखेडेवर सामना असल्यावर येथे हजेरी लावतात. अरबी समुद्राच्या किनारी मरीन ड्राईव्हजवळ हे ३३ हजार क्षमता असलेले भव्यदिव्य स्टेडियम आहे. मुंबई रणजी संघाच्या दैदिप्यमान इतिहासाच्या अनेक पाऊल खुणा येथे आहेत. २०११मध्ये भारतीय संघ याच मैदानावर आयसीसी वनडे विश्वचषक जिंकला होता.
याच मैदानावर कसोटीत कुणी सर्वाधिक धावा केल्या किंवा कोण सर्वाधिक सामने खेळले याची फारशी माहिती नाही. मुंबईत आंतरराष्ट्रीय सामने झालेली तशी तीन मैदाने. बाॅंबे जिमखाना, ब्रेबाॅन स्टेडियम व वानखेडे स्टेडियम. प्रत्येकाची आपली एक वेगळी ओळख आहे. परंतु तरीही वानखेडेबद्दल चाहत्यांना काही विशेष प्रेम आहेच. Players to score most runs on Wankhede Stadium, Mumbai.
भारतीय संघ या स्टेडियमवर एकूण २५ कसोटी सामने खेळला असून इंग्लंड व वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी ८ सामने तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामने खेळला आहे. २५ पैकी भारतीय संघ येथे ११ कसोटी सामने जिंकला असून ७ पराभव पाहिले आहेत तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या लेखात याच वानखेडेवर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची आपण माहिती करुन घेणार आहोत.
५. सईद किरमाणी (४७७ धावा)
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक राहिलेल्या सईद किरमाणी यांनी १९७६ ते १९८४ या काळात येथे ९ कसोटीत १३ डाव खेळले. यात त्यांनी ४७.७०च्या सरासरीने २ शतके व १ अर्धशतकांच्या मदतीने ४७७ धावा केल्या आहेत. २ वेळा ते येथे ० धावेवर बाद झाले होते.
४. राहुल द्रविड (६१९ धावा)
भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखला जाणारा व कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा महान फलंदाज राहुल द्रविडने येथे ७ कसोटी सामने खेळले. यात १३ डावात ५६.२७च्या सरासरीने त्याने ६१९ धावा केल्या. यात १ शतक व ४ अर्धशतकी खेळींचाही समावेश आहे. १९९७ ते २०११ या काळात तो येथे कसोटी सामना खेळला.
३. दिलीप वेंगसरकर (६३१ धावा)
लाॅर्ड्स क्रिकेट मैदानासारखेच वानखेडे स्टेडियमही मुंबईकर दिलीप वेंगसरकरांसाठी लकी ठरले. या मैदानावर त्यांनी १० सामन्यात १७ डावात ४८.५३च्या सरासरीने ६३१ धावा केल्या. यात त्यांनी २ शतके व २ अर्धशतके केली. ते एकदा ० धावेवरही येथे बाद झाले. १९७८ ते १९८८ या काळात ते येथे कसोटी सामने खेळले.
२. सचिन तेंडूलकर (९२१ धावा)
मुंबईकर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २०१३ मध्ये कारकिर्दीतील शेवटचा अर्थात २००वा कसोटी सामना या मैदानावर खेळला. शेवटच्या सामन्यात तो ७५ धावांवर बाद झाला. जर या सामन्यात त्याने एकूण १५४ धावा केल्या असत्या तर वानखेडेवर कसोटीत १ हजार धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला असता. त्याने १९९३ ते २०१३ या काळात येथे ११ कसोटीत १९ डावात ४८.४७ सरासरीने ९२१ धावा केल्या. त्यात १ शतक व ८ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन कसोटीत कधीही या मैदानावर ० धावेवर बाद झाला नाही.
१. सुनिल गावसकर (११२२ धावा)
मुंबईकर सुनिल गावसकरांसाठी हे स्टेडियम अतिशय लकी स्टेडियमपैकी एक ठरले. भारतात केवळ तीन खेळाडूंनी वेगवेगळ्या स्टेडियमवर १ हजार धावा केल्या आहेत. व्हिव्हिएस लक्ष्मणने इडन गार्डन, कोलकाता येथे कसोटीत १२१७, सुनिल गावसकर यांनी वानखेडे, मुंबई ११२२ तर चेपाॅक, चेन्नईला १०१८ धावा केल्या आहेत. असा कारनामा कुणालाही आजपर्यंत भारतात जमला नाही. गावसकरांनी वानखेडेवर ११ कसोटीत २० डावात फलंदाजी करताना ५६.१०च्या सरासरीने ११२२ धावा केल्या. यात त्यांनी ५ शतकी व ३ अर्धशतकी खेळी केल्या. विशेष म्हणजे गावसकरांनी ब्रेबाॅर्न स्टेडियमवरही १ कसोटी सामना खेळला असून त्यात ७१ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
एकाच स्टेडियमवर कसोटीत २ हजारपेक्षा जास्त धावा करणारे ५ खेळाडू
पदार्पणाच्या कसोटी सामन्यातचं दोन्ही डावात शतके करणारे २ खेळाडू
बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलबद्दल अखेर झाला मोठा निर्णय