क्रिकेट जगतात देशांतर्गत क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. या सर्व क्रिकेट स्पर्धांची भरमार असतानाही २००८ साली एका टी२० लीगने क्रिकेटविश्वात एंट्री मारली आणि खूप कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. ही टी२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल).
या लीगच्या पहिल्या हंगामात जगभरातील वेगवेगळ्या देशातील क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पण या प्रतिष्ठित लीगमध्ये जास्त वर्षे टिकून राहण्यासाठी खेळाडूंना सातत्याने चांगली कामगिरी करत रहावे लागते. आजवर बऱ्याच खेळाडूंना त्यांच्या पूर्ण हंगामातील खराब प्रदर्शनामुळे पुढे जास्त संधी मिळाल्या नाहीत, तर काही खेळाडूंनी दुखापतींमुळे, वय झाल्यामुळे किंवा इतर बऱ्याच कारणामुंळे आयपीएलमधून माघार घेतली.
असे असले तरी, काही खेळाडू मात्र पहिल्या हंगामापासून आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत आणि अद्यापही त्यांनी आयपीएलमध्ये त्यांचे स्थान टिकवून ठेवले आहे. आम्ही या लेखात अशाच भारतीय खेळाडूंची माहिती तुम्हाला देणार आहोत. चला तर पाहूया…
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंतच्या हंगामात खेळणारे खेळाडू- Players who have played in all 13 IPL seasons 2008 to 2020
एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून म्हणजेच २००८ पासून खेळत आहे. तो सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्स या फ्रँचायझी संघाचा भाग राहिला आहे. मध्यंतरी २०१६ आणि २०१७ या हंगामांमध्ये चेन्नई संघावर बंदी घातल्यामुळे धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. त्याने चेन्नईला २०१०, २०११ आणि २०१८ या हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले होते. आयपीएल २०२० मध्येही म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या हंगामात तो आपल्या संघाला आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.
धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४२.२२ च्या सरासरीने ४४७६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २३ अर्धशतके ठोकली आहेत.
रोहित शर्मा
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो २०११ पासून मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. पुढे तो मुंबईचा कर्णधार झाला. त्याने मुंबईला २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या चार हंगामात आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. आयपीएल २०२० मध्ये तो मुंबईला आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.६३ च्या सरासरीने ४९९८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतक आणि ३७ अर्धशतके ठोकली आहेत.
दिनेश कार्तिक
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकही आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहेत. त्याने आपला पहिला हंगाम दिल्ली डेअरडेविल्स (आताचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याने किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही प्रतिनिधित्व केले. आयपीएल २०१८ पासून तो कोलकाता संघाचा कर्णधार आहे. आयपीएल २०२० च्या हंगामात तो आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८४ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २६.८९ च्या सरासरीने ३६८४ धावा केल्या आहेत. यामध्ये १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या फ्रँचायझी संघाकडून खेळत आहे. त्याच्या नेतृत्त्वात बेंगलोर संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. आयपीएल २०२० मध्ये तो बेंगलोर संघाला आयपीएलचे पहिले वहिले विजेतेपद जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.
विराटने आपल्या संघाला विजेतेपद जिंकून दिले नसले तरी, तो आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलचे १८० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.२२ च्या सरासरीने ५४३५ धावा केल्या आहेत. या धावा जमवताना त्याने ५ शतके आणि ३६ अर्धशतके ठोकली आहेत.
रॉबिन उथप्पा
यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला आहे. आयपीएल २०२० मध्ये तो आयपीएलचा पहिला विजेता राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.५४ च्या सरासरीने ४४२५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २४ अर्धशतके ठोकली आहेत.
शिखर धवन
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन हादेखील आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे. आयपीएल २०१९ पासून तो दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आहे. आयपीएलच्या २०२० या हंगामात तो दिल्ली संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६२ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३३.२० च्या सरासरीने ४६१५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३७ अर्धशतकेही ठोकली आहेत.
पीयूष चावला
भारतीय संघाचा गोलंदाज पीयूष चावलाने आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यापुढे तो २०१३ पर्यंत पंजाब संघाचा भाग होता. त्यानंतर तो कोलकाता संघात सामील झाला. आयपीएल २०२० मध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या हंगामात आपल्या फिरकी गोलंदाजीने चेन्नईला आयपीएलचे चौथे विजेतेपद जिंकून देण्याचा तो प्रयत्न करेल.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १६० सामने खेळले आहेत. त्यात त्याने २७.१४ च्या सरासरीने १५४ विकेट्स आपल्या नावावर केले आहेत.
एबी डिविलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी फलंदाज एबी डिविलियर्सही आयपीएलमध्ये पहिल्या हंगामापासून खेळत आहे. पहिल्या हंगामात तो दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळला होता. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामील झाला. तो आयपीएल २०२० मध्येही बेंगलोर संघाकडून खेळत आहे. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत खेळणारा एकमेव परदेशी खेळाडू आहे.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४९ च्या सरासरीने ४५३५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत.
अमित मिश्रा
भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्राही आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर तो डेक्कन चार्जर्स पुढे सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला. आयपीएल २०२० मध्ये म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या हंगामात तो दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४.२५ च्या सरासरीने १५९ विकेट्स घेतल्या आहेत.
मनीष पांडे
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज मनीष पांडेने आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलच्या १३ व्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३३ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २९.३१ च्या सरासरीने २९३१ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे.
वृद्धिमान साहा
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आयपीएलमध्ये पहिल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या आयपीएल २०२० मध्ये म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२१ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २३.९३ च्या सरासरीने १७९५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ६ अर्धशतके ठोकली आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
-जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…
-परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या
-…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ





