आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये चांगल्या खेळाडूंवर मोठी बोली लागते. आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने ऑट्रेलियाच्या अष्टपैलू क्रिकेटपटू पॅट कमिन्सवर सर्वाधिक तब्बल १५.५० कोटीची बोली लावून आपल्या संघात घेतले. तसेच या स्पर्धेत खेळाडूंसोबत संघाच्या प्रमुख प्रशिक्षकांनाही चांगले पैसे मिळतात. या खास लेखात आपण आयपीएलच्या सर्व संघ प्रशिक्षकांच्या पगाराबद्दल चर्चा करणार आहोत.
रिकी पॉन्टिंग – दिल्ली कॅपिटल्स
रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. हाच कर्णधार पुढे आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागला. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षकपद काही काळ सांभाळले. रिकी पॉन्टिंगने प्रशिक्षक असताना मुंबई इंडियन्स २०१५ मध्ये चॅम्पियन बनविले. पॉन्टिंगने २०१७ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक पद स्वीकारले. तेव्हापासून आतापर्यंत तो दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आहे. एका हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे ३.४ कोटी घेतले आहे. आयपीएल २०२० मध्ये, त्याच्या उत्कृष्ट प्रशिक्षणाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल चॅम्पियन बनवू इच्छित आहे.
माहेला जयवर्धने – मुंबई इंडियन्स
श्रीलंकेचा महान फलंदाज माहेला जयवर्धनेने कसोटी आणि वनडे सामन्यात प्रत्येकी १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
माहेला जयवर्धने आयपीएलच्या पहिल्या ६ सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळ संघात फलंदाज म्हणून खेळला होता. परंतू जयवर्धने २०१७ पासून मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तो मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देतो. तो फलंदाजी प्रशिक्षक असतानाच २०१७ मध्ये आणि २०१९ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तो मुंबई इंडियन्सकडून प्रत्येक हंगामासाठी २.२५ कोटी रुपये घेतो.
ब्रॅडेन मॅक्युलम – कोलकाता नाइट रायडर्स
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ब्रॅडेन मॅक्युलम हा जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांपैकी एक आहे.
ब्रॅडेन मॅक्युलम आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, कोची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. आयपीएल २०२० मध्ये त्याने कोलकाता संघाची प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्यांचा पहिला हंगाम असेल. त्याचबरोबर या आयपीएलमध्ये प्रशिक्षणासाठी तो केकेआरकडून ३.४ कोटी रुपये घेत आहे.
सायमन कॅटिच – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
किंग्स इलेव्हन पंजाबकडून पहिल्या दोन मोसमात सायमन कॅटिच खेळला होता. परंतु, फलंदाज म्हणून त्याची कामगिरी चांगली नव्हती, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया संघातून वगळल्यानंतर कॅटिच २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि २०१९ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघात सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत राहिला. आता कॅटिच आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा मुख्य प्रशिक्षक असेल. या हंगामात तो आरसीबीकडून ४ कोटी रुपये घेत आहे.
ट्रेवर बेलिस – सनरायझर्स हैदराबाद
ट्रेव्हर बेलिस हा सध्या आयपीएलच्या इतिहासातील एकमेव असा प्रशिक्षक आहे ज्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. परंतु टी-२० क्रिकेट स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून देणारा तसेच इंग्लंडला २०१९ चा विश्वचषक जिंकून देणारा यशस्वी प्रशिक्षक आहे. आयपीएल २०२० मध्ये जेतेपद पटकाविण्याच्या उद्देशाने सनरायझर्स हैदराबाद संघ मॅनेजमेंटने टॉम मूडीची जागा ट्रेवर बेलिस याला देऊन हैदराबादचा प्रशिक्षक बनवले. त्याला सनरायझर्सने २.२५ कोटी रुपये माधनधन दिले आहे.
अँड्र्यू मॅकडोनाल्ड – राजस्थान रॉयल्स
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू अँड्र्यू मॅकडोनाल्डला आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२० चा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. अँड्र्यू मॅकडोनाल्डने ऑस्ट्रेलियन संघाकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २१.४० च्या सरासरीने १०७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ९ बळी घेतले आहेत. मुख्य प्रशिक्षक म्हणून आयपीएलमधील हा त्याचा पहिलाच हंगाम आहे आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून या मोसमासाठी तो एकूण ३.४ कोटी रुपये घेत आहे.
अनिल कुंबळे – किंग्ज इलेव्हन पंजाब
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेने आयपीएलच्या पहिल्या तीन सत्रात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले होते. एक खेळाडू म्हणून, आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यावर दोन वर्षे कुंबळे मुंबई इंडियन्सचा मुख्य मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्वकारली होती. आयपीएल २०२० साठी किंग्ज इलेव्हन पंजाबने संघाने भारताच्या या माजी महान खेळाडूची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून तो एकूण ४ कोटी घेतो आहे.
स्टीफन फ्लेमिंग – चेन्नई सुपर किंग्ज
न्यूझीलंड क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आणि कर्णधार म्हणून स्टीफन फ्लेमिंग याला ओळखले जाते. २००० मध्ये फ्लेमिंगच्या नेतृत्वात न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, जी आतापर्यंत कीवी संघाची एकमेव आयसीसी ट्रॉफी आहे.
डावखुरा फलंदाज फ्लेमिंगने आपल्या कारकिर्दीत ७१७२ कसोटी आणि ८०३७ वनडे धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जला प्रशिक्षण देण्यापूर्वी फ्लेमिंग त्याच संघाकडून फलंदाज म्हणूनही खेळला आहे. त्याने चेन्नईला ३ वेळा आपल्या प्रशिक्षणांअंतर्गत आयपीएल चॅम्पियन बनवले आहे. फ्लेमिंग चेन्नई सुपर किंग्जकडून हंगामात एकूण ३.४ कोटी रुपये घेत आहे.