आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय टी२० संघाच्या नेतृत्वाला राम राम केले होते. आता ही मोठी जबाबदारी भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला देण्यात आली आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेतून तो आपल्या नवीन कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.
नियमित टी२० कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असल्यामुळे रोहित शर्मा चांगली कामगिरी करून विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ कुठल्या प्लेइंग इलेव्हेनसह मैदानात उतरू शकतो, हे या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी आक्रमण मजबूत आहे. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि ईश सोढी हे गोलंदाज भारतीय संघाला अडचणीत टाकू शकतात. त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेत सांभाळून फलंदाजी करावी लागणार आहे. भारतीय संघात एका पेक्षा एक चांगले खेळाडू आहेत. परंतु हार्दिक पंड्या या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे या संघात फिनिशरची भूमिका कोण पार पाडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या भूमिकेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरकडे पाहिले जात आहे. भारतीय संघासाठी डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि केएल राहुल करताना दिसून येतील.
तिसऱ्या क्रमांकासाठी ऋतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते, तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी दिली जाऊ शकते. तसेच श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाल्यामुळे सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. त्यानंतर रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर येऊन मोठी फटकेबाजी करताना दिसून येऊ शकतात.
या मालिकेसाठी रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. तो गोलंदाजीसह फलंदाजी देखील करू शकतो. तसेच टी२० विश्वचषक स्पर्धेतून वगळण्यात आलेल्या युझवेंद्र चहलचे या मालिकेत पुनरागमन होणार आहे. वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि हर्षल पटेल यांना देखील संधी दिली जाऊ शकते.
न्यूझीलंड संघाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी संभावित ११ जणांचा भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, दीपक चाहर, हर्षल पटेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍशेस मालिकेत इंग्लंडला आव्हान देण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज; पहिल्या २ सामन्यांसाठी संघाची घोषणा
रोहित शर्माच्या नेतृत्वात काय असेल विराट कोहलीची भूमिका? ‘हिटमॅन’ने दिले उत्तर