पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी२० लीग सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेटची विस्कटलेली आर्थिक घडी या लीगमूळे पुन्हा एकदा बसू शकते. आता या लीगबाबत मागील दोन दिवसांपासून अनेक महत्त्वाच्या अपडेट येत आहेत. खेळाडूंच्या लिलावाबाबतचे नियम सार्वजनिक केल्यानंतर आता, सर्व संघांनी करारबद्ध केलेल्या मार्की खेळाडूंबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे.
या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार असल्याची माहिती स्पर्धेचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी दिली होती. लिलावापूर्वी प्रत्येक संघ पाच खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. या पाचपैकी तीन खेळाडू विदेशी, एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय व एक अनकॅप्ड खेळाडू असेल. एका संघात १७ खेळाडू असणे आवश्यक आहे. या लीगच्या प्लेइंग इलेव्हनचे प्रारूप आयपीएलप्रमाणे असेल. यात सात दक्षिण आफ्रिकेचे तर, चार विदेशी खेळाडू सहभागी असतील. आयपीएलनंतर लिलाव घेणारी ही जगातील केवळ दुसरी टी२० लीग असेल.
लीगमधील सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतलेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स यांचा समावेश आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, मुंबईच्या मालकीच्या एमआय केपटाउन संघाने राशिद खान, कगिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन व सॅम करन यांना करारबद्ध केले आहे. तर, चेन्नईच्या मालकीच्या जोहान्सबर्ग फ्रॅंचाईजीने फाफ डू प्लेसिस व मोईन अली या आयपीएलमधील आपल्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. अनेक वर्ष चेन्नईसाठी खेळल्यानंतर फाफ यावेळी आरसीबीचा भाग बनला होता. याव्यतिरिक्त राजस्थानच्या मालकांची फ्रॅंचाईजी असलेल्या पार्लेने जोस बटलरला आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले आहे. दिल्ली कॅपिटलच्या मालकीच्या प्रिटोरिया संघाने एन्रिक नॉर्किए, सनरायझर्सने एडेन मार्करम व लखनऊ सुपरजायंट्सच्या डरबन फ्रॅंचायजीने क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर पुढील महिन्यात खेळाडूंचा लिलाव पार पडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच
मराठीत माहिती- क्रिकेटर यशपाल शर्मा