शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे शेवटचे २ साखळी फेरी सामने पार पडले. यातील पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. मुंबईने ४२ धावांनी हा सामना जिंकला. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला असून बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर दिल्लीला चितपट केले. त्यांनी ७ विकेट्सने हा सामना खिशात घातला. या सामन्यांसह प्लेऑफ पात्र संघांचे आणि गुणतालिकेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ सर्वाधिक २० गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज ((१८ गुण), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (१८ गुण) आणि कोलकाता नाईट रायडर्स (१४ गुण) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. या चारही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
भलेही दिल्ली संघाला आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. परंतु त्यांनी आतापर्यंत ३ वेळा गुणातालिकेत अव्वलस्थानावर कब्जा केला आहे. २००९ मध्ये पहिल्यांदा हा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी राहिला होता. त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा त्यांनी हा मान मिळवला. परंतु पुढील हंगामात त्यांचे प्रदर्शन तितके विशेष राहिले नाही. त्यामुळे पुन्हा हे स्थान पटकावण्यासाठी त्यांना तब्बल ९ हंगाम वाट पाहावी लागली आहे.
गुणतालिकेत सर्वाधिक वेळा प्रथमस्थान भूषवण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला आहे. त्यांनी आतापर्यंत विक्रमी ४ वेळा पहिले स्थान पटकावले आहे.
आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात गुणातालिकेत अव्वलस्थानी राहणारे संघ-
२००८- राजस्थान रॉयल्स
२००९- दिल्ली कॅपिटल्स
२०१०- मुंबई इंडियन्स
२०११- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
२०१२- दिल्ली कॅपिटल्स
२०१३- चेन्नई सुपर किंग्ज
२०१४- पंजाब किंग्ज
२०१५- चेन्नई सुपर किंग्ज
२०१६- गुजरात लायन्स
२०१७- मुंबई इंडियन्स
२०१८- सनरायझर्स हैदराबाद
२०१९- मुंबई इंडियन्स
२०२०- मुंबई इंडियन्स
२०२१- दिल्ली कॅपिटल्स
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबाद पहिल्यांदाच गुणतालिकेत तळाशी, पण खालून पहिला येण्यात ‘या’ संघांची जणू पीएचडीच झालीय!
आयपीएल २०२१चे टॉप-४ संघ मिळाले, मग यापूर्वी प्रत्येक हंगामात प्लेऑफ गाठणारे संघ माहितीय का? वाचा
बाबो.! ‘या’ खेळाडूची एक विकेट राजस्थानला पडली भलतीच महागात, पुढील हंगामात लांबूनच नमस्कार