वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा किरॉन पोलार्ड त्याच्या खेळासाठी तसेच त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टी20 लीग, मैदानावर असे अनेक प्रसंग घडले आहेत; जेव्हा पोलार्डचे आपल्या भावनांवरील नियंत्रण हरवून बसला आहे. तो पुन्हा एकदा अशाच एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील एका सामन्यात त्याने पुन्हा असेच काहीसे केले आहे, ज्याचा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे.
सीपीएल 2021 च्या नवव्या सामन्यात त्रिनबागो नाईट रायडर्सचा सामना सेंट लुसिया किंग्जशी चालू होता. या सामन्यात सेंट लुसियाने नाणेफेक जिंकल्यानंतर नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. किरॉन पोलार्ड आणि टिम सेफर्ट त्रिनबागो नाईट रायडर्सच्या डावादरम्यान 19व्या षटकात फलंदाजी करत होते. अशात गोलंदाज केसरिक विल्यम्सने एक चेंडू ऑफ-स्टंपच्या खूप बाहेर फेकला, इतका की फलंदाज सेफर्टला डायव्ह मारून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. चेंडू बॅटला लागलाच नाही. पण पंचांनी यावर विश्वास ठेवला नाही आणि वाईड बॉल दिला नाही.
हे दृश्य पाहिल्यानंतर सेफर्टने पंचांना प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त केली. पण दुसऱ्या टोकावर उभा असलेला कर्णधार किरॉन पोलार्ड इतका चिडला की, त्याने आपला निषेध व्यक्त करण्याचा एक विचित्र मार्ग स्वीकारला. तो खेळपट्टीपासून खूप दूर जाऊन उभा राहिला. पोलार्ड 30 यार्ड वर्तुळाच्या जवळ उभा राहिला आणि हे दृश्य पाहिल्यानंतर बरेच खेळाडू हसत राहिले. पोलार्ड पंचांना सांगण्याचा प्रयत्न करत होता की, कदाचित वाईड देण्याची सीमा खेळपट्टीपासून खूप दूर आहे.
https://twitter.com/hassam_sajjad/status/1432732914257641474?s=20
या सामन्यात पोलार्डने 29 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर त्याचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 158 धावांपर्यंत पोहोचू शकला. प्रत्युत्तरादाखल आंद्रे फ्लेचरने सेंट लुसिया किंग्जसाठी नाबाद 81 धावा केल्या आणि सामन्याला रोमांचक बनवले. फ्लेचरने उत्कृष्ट खेळी खेळली पण संघाचे इतर सर्व फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. परिणामी फ्लेचर नाबाद राहिला पण सेंट लुसियाला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 131 धावा करता आल्या आणि सामनाही गमवावा लागला.
सामन्यादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पोलार्ड वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतो आणि त्यासाठी त्याच्यावर काही कारवाई केली जाऊ शकते. पण तो आपल्या संघाला या मोसमातील दुसरा विजय मिळवून देण्यात यशस्वी झाला आहे आणि त्याला ‘सामनावीर’ म्हणूनही गौरवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार
चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची आहे दाट शक्यता
बिग ब्रेकिंग! तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड, करणार कसोटी पदार्पण






