मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग अडचणीत सापडला आहे. त्याने युवा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या टिक टॉक व्हिडिओवर जातीवाचक टिप्पणी केली होती. त्यानंतर हरियाणातील एका कार्यकर्ता, वकील रजत कल्सन यांनी त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जातीवाचक शब्दाचा वापर करणे युवराजला चांगलेच महागात पडले.
युवी सोबत रजत यांनी सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याच्यावर देखील आरोप केले आहेत. जातीवाचक टिप्पणी करताना रोहित शर्मा हसत होता. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषी आढळल्यास रोहित आणि युवी यांच्यावर कारवाई होऊ शकते. या प्रकरणामुळे युवराजच्या अडचणीत वाढ झाली आहे.
https://twitter.com/iamns3010/status/1267531656195215361
याबाबत अधिक माहिती अशी की, लॉकडाऊनच्या काळात युजवेंद्र चहल अनेक गमतीशीर व्हिडिओ बनवत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी युवराज आणि रोहित सोशल मीडियावर लाइव्ह संवाद साधत होते. दोन्ही खेळाडू क्रिकेट आणि कोरोना सारख्या मुद्यांवर चर्चा करत होते. या चर्चेत त्यांनी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यावरही चर्चा केली, तेव्हा युवीने युजवेंद्रच्या एका व्हिडिओवर जातीवाचक शब्दांचा वापर केला. त्यानंतर ट्विटरवर, युवराजसिंग माफी मागावी असा ट्रेंड सुरू झाला.