विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये काही खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. हा हंगाम पाहून सध्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ सर्वाधिक आनंदी दिसत आहे. या संघातील अनेक खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. यामध्ये दोन ‘अनकॅप्ड’ खेळाडूंनी आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली असून या दोघांनीही गोलंदाजी आणि फलंदाजीने कमाल दाखवली आहे. त्यांची ही कामगिरी पाहून सीएसके व्यवस्थापन खूप खुश आहे.
वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू रामकृष्ण घोषने (Ramkrushn ghosh) आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये 5 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13.19 च्या शानदार सरासरीने 16 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. या दरम्यान त्याने एकदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरीही केली. घोषचा इकॉनॉमी रेट 5.31 राहिला आहे.
फलंदाजीमध्ये रामकृष्णने 5 सामन्यात 68 च्या सरासरीने 204 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 राहिली असून त्याचा स्ट्राईक रेट 136 चा आहे. रामकृष्णने १४ चौकार आणि 10 षटकारही लगावले असून दोन अर्धशतके ठोकली आहेत. गेल्या हंगामात घोषला संधी मिळाली नव्हती, तरीही त्याला संघात कायम (Retain) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या हंगामात त्याला सतत खेळण्याची संधी मिळू शकते.
स्पिनर अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरने (Prashant veer) आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफी 2025-26 च्या 5 सामन्यात 30.42 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट केवळ 4.95 राहिला आहे. फलंदाजीत प्रशांतने 5 सामन्यात 91 च्या सरासरीने 91 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 154.23 इतका जबरदस्त आहे. वीरने 5 सामन्यांतील 4 डावात फलंदाजी केली, ज्यामध्ये तो 3 वेळा नाबाद परतला आहे. एक ‘फिनिशर’ म्हणून प्रशांत सहजपणे मोठे फटके खेळताना दिसतो. हे पाहता, सीएसके त्याला रवींद्र जडेजाचा पर्याय (Replacement) म्हणून का पाहत आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.






