भारतीय क्रिकेटर असोसिएशनने बुधवारी (२३ डिसेंबर) झालेल्या बैठकीत माजी फिरकीपटू प्रग्यान ओझाला आयपीएलच्या संचालक परिषदेसाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ डिसेंबरला अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी माजी यष्टीरक्षक-फलंदाज सुरिंदर खन्ना असोसिएशनचे प्रतिनिधीपद सांभाळत होते. बीसीसीआयच्या नियमानुसार इंडियन क्रिकेटर असोसिएशनला दरवर्षी आपला एक प्रतिनिधी आयपीएलच्या संचालक परिषदेसाठी नियुक्त करणे गरजचे आहे.
प्रग्यान ओझाची निवड झाल्यानंतर पीटीआयशी बोलताना इंडियन क्रिकेटर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा म्हणाले, “असोसिएशनच्या सल्लागार मंडळाने ओझाची निवड आयपीएलच्या संचालक परिषदेसाठी केली आहे. सुरिंदर खन्नांनी उत्तम काम केले. आणि आम्ही सगळ्यांनाच समान संधी देण्यास इच्छुक आहोत.” प्रग्यान ओझाचा कार्यकाल पुढील एक वर्षासाठी असेल. त्याने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
असोसिएशनने जाहीर केलेल्या पत्रकात म्हंटले, “असोसिएशनच्या सदस्यांनी प्रतिनिधीची निवड करण्यासाठी सल्लागार मंडळाला अधिकार दिले होते. आणि त्यांनी परस्पर हितसंबंधांचा मुद्दा लक्षात घेऊन विचारविनिमय करत प्रग्यान ओझाची प्रतिनिधीपदावर नियुक्ती केली.”
ओझा आता बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इंडियन क्रिकेटर असोसिएशनचे प्रतिनिधित्व करेल. या बैठकीत टी-२० विश्वचषक, आयपीएलचे संघ तसेच विविध क्रिकेट समित्यांची निवड या विषयांवर प्रामुख्याने चर्चा होईल. तसेच राजीव शुक्ला यांच्या नावाचीही बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून औपचारिक घोषणा करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या:
– व्हिडिओ: बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा खेळणार? करतोय कसून सराव
– बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी सचिनचा भारतीय फलंदाजांना कानमंत्र, म्हणाला
– हा भारतीय करू शकतो मेलबर्नमध्ये कसोटी पदार्पण; बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ