भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील उर्वरित ३ सामने याच स्टेडियमवर होणार आहेत. यानंतर भारत व इंग्लंड संघादरम्यान ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या पुण्यातील स्टेडियमवर होणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय संघात काही नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
वेगवान गोलंदाज प्रसिदध कृष्णा व अष्टपैलू खेळाडू क्रृणाल पंड्याचे नाव यात आघाडीवर आहे. या दोनही खेळाडूंनी नुकत्याच संपलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली आहे. क्रिकबझने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार या दोन खेळाडूंना वनडे मालिकेत संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
प्रसिद्ध कृष्णाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत कर्नाटक संघाकडून खेळताना ७ सामन्यात २२.२च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत. कर्नाटककडून या स्पर्धेत त्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर कर्नाटक यावेळी विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत पोहचली होती. उपांत्यफेरीत मात्र कर्नाटकला मुंबईकडून ७२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातही प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या बाजूला क्रृणाल पंड्याने बडोद्याकडून खेळताना विजय हजारे ट्रॉफीत अष्टपैलू कामगिरी केली. या हंगामात त्याने बडोद्याकडून सर्वाधिक अर्थात ५ सामन्यात १२९ च्या सरासरीने ३८८ धावा केल्या. यात दोन शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता. याबरोबर त्याने ५ विकेट्स देखील घेतल्या.
शॉ व पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता कमी
पंड्या व प्रसिद्ध कृष्णा सोडून देवदत्त पडिक्कल व पृथ्वी शॉ यांनीही विजय हजारे ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांवरही निवड समितीची नजर असणार आहे. शॉ नेतृत्त्व करत असलेल्या मुंबईने यावेळी विजय हजारे ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शॉच्या नावावर झाला आहे. त्याने केवळ ८ सामन्यात १६५च्या सरासरीने ८२७ धावा केल्या आहेत. त्याने ४ शतक व १ अर्धशतक या स्पर्धेत केले आहे. तर कर्नाटककडून सलामीला फलंदाजीला येत पडिक्कलने ७ सामन्यात १४७ च्या सरासरीने ७३७ धावा केल्या. त्याने सातही सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या. असे असले तरी संघात शिखऱ धवन, केएल राहुल, रोहित शर्मा व शुबमन गिलसारखे खेळाडू सलामीला असताना शॉ व पडिक्कलला संधी मिळणे कठीण दिसतेय.
भारतीय संघ २३, २६ व २८ मार्च रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्ध सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-इंग्लंड टी२० मालिका रद्द करा, नाहीतर स्वत:ला जिवंत जाळेन; एका व्यक्तीची थेट पोलिसांना धमकी
सूर्यकुमार-इशान नंतर ‘हा’ युवा धुरंधर गाजवणार क्रिकेटचं मैदान, तिसऱ्या टी२०त मिळणार संधी?
अरे बापरे! इशान किशनच्या पदार्पणाच्या दिवशी गर्लफ्रेंडने केलं असं काही, पाहून वाटेल आश्चर्य






