पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारपासून (२३ मार्च) ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे येथे सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने ४ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे त्याने या सामन्यातून पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या वनडे सामन्यात जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स आणि टॉम करन यांना बाद केले. त्यामुळे तो वनडे पदार्पणात ४ विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच पुरुष गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही पुरुष गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. यापूर्वी एकूण १६ भारतीय पुरुष गोलंदाजांनी पदार्पणाच्या वनडे सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, त्यातील कोणालाही ४ विकेट्स घेता आल्या नव्हत्या.
तसेच यापूर्वी भारताच्या पौर्णिमा चौधरी या महिला क्रिकेटपटूने १९९७ साली वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे पदार्पण करताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताने मिळवला विजय
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३१७ धावा केल्या. यावेळी भारताकडून शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२*) व कृणाल पंड्या (५८*) यांनी अर्धशतके ठोकली. तसेच रोहितने २८ आणि श्रेयसने ६ धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी गोलंदाजी करताना अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.
त्यानंतर प्रतिउत्तरादाखल इंग्लंडला ४२.१ षटकात सर्वबाद २५१ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ९४ धावांची खेळी केली. तर जेसन रॉयने ४६ धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांना फार खास काही करता आले नाही. गोलंदाजी करताना भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ विकेट्स, भुवनेश्वर कुमारने २ आणि कृणाल पंड्याने १ विकेट घेतली.
प्रसिद्ध कृष्णाची कारकिर्द
प्रसिद्ध कृष्णा हा भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३४ वा खेळाडू ठरला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ सामने खेळले असून २०.२६ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने ४८ अ दर्जाच्या सामन्यात २३.०७ च्या सरासरीेने ८१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ४० ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २४ सामने खेळले असून यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
साता जन्माच्या गाठी! नवविवाहित बुमराह दाम्पत्याचा व्हिडिओ आला सर्वांसमोर, तुम्हीही घ्या पाहून