झी टॉकीज वाहिनीवर महाराष्ट्राच्या कुस्तीची परंपरा दाखवणारा ‘झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’ हा २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर रोज संध्याकाळी ६ ते १० वाजता सुरु असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटक-चित्रपट-मालिकामधील लेखक व दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांच्याबरोबर त्याच ताकदीने घराघरामध्ये पोहोचलेली सर्वांची आवडती सौंदर्यवती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करत आहे .
‘मार मुसंडी ‘हे झी महाराष्ट्र कुस्ती दंगलीचे ब्रीदवाक्य सध्या पहाडी आवाजात महाराष्ट्रातील सर्व घराघरामध्ये ऐकायला मिळत आहे. हा आवाज प्रवीण विठ्ठल तरडे यांचाच. पिंजरा, कुंकू, तुझं माझं जमेना, कन्यादान यांसारख्या मालिकांसाठी प्रसिद्ध असलेले हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व प्रथमच छोट्या पडद्यासाठी सूत्रसंचलन करताना दिसेल.
फार कमी लोकांना माहीत असेल की पितृऋण व रेगे यांसारख्या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लिहिणारे प्रवीण शाळा-कॉलेजात असताना कबड्डी, सॉफ्टबॉलचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यामुळे त्यांचे क्रीडाप्रेम वेगळे सांगायला नको! कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, फर्जंद, मोकळा श्वास, पुणे व्हाया बिहार यांसारखे अनेक चित्रपट आणि कुंकू सारखी लोकप्रिय मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेली मृण्मयी अशा या दोघांचे सूत्रसंचालन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे.
कुस्तीचा रांगडेपणा आणि त्याचबरोबर या खेळाला हवी असलेली ग्लॅमरची प्रवीण तरडे सांभाळत असताना त्यातील मनोरंजनाचा भाग चतुरस्त्र अभिनेत्री मृण्मयी देशपांडे अतिशय खुबीने सांभाळत आहेत . झी महाराष्ट कुस्ती दंगल या शोच्या फॉरमॅटमध्ये राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला व पुरुष कुस्ती चॅम्पियन्स एकमेकांसोबत २ नोव्हेंबरपासून १८ नोव्हेंबरपर्यंत भिडताना दिसतील.
महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून बनवलेलया सहा संघातर्फे म्हणजेच वीर मराठवाडा, कोल्हापुरी मावळे, विदर्भाचे वाघ, यशवंत सातारा, पुणेरी उस्ताद आणि मुंबई अस्त्र हे कुस्तीगीर खेळणार आहेत. हे सर्व सामने श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजेच पुण्याच्या म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये सुरु आहेत.
कुस्तीगीरांमधील रंगणाऱ्या अटीतटीच्या सामन्यांचे सूत्रसंचलन करताना अग्निहोत्र, कुंकू फेम मृण्मयी दिसणार आहे. होस्ट म्हणून तिने याआधीही काम केले आहे. पुणे व्हाया बिहार यांसारख्या चित्रपटांतून झळकलेली ही मराठी स्टार झी महाराष्ट्र कुस्ती दंगलबद्दल खूप उत्साहित आहे.
कुस्तीसारख्या आपल्या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावर नेण्याचे शिवधनुष्य पेलत असलेल्या झी टॉकीजच्या या उपक्रमात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा मृण्मयीला खूप आनंद आहे. काहीशी सारखीच भावना व्यक्त केली आहे नाटक-चित्रपट-मालिकामधील लेखक व दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी. थोडक्यात काय तर मृण्मयी आणि प्रवीण या होस्ट आणि दोस्तच्या जोडीनिमित्त झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचे ग्लॅमर आणखीन वाढणार आहे.
कुस्तीसारख्या आपल्या मातीतल्या खेळाला जागतिक स्तरावर नेण्याचे शिवधनुष्य पेलत असलेल्या झी टॉकीजच्या या उपक्रमात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा प्रवीण आणि मृण्मयीला या दोघांनाही खूप आनंद आहे.
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलचे साक्षीदार बनत आशीर्वाद देण्यासाठी साक्षात हनुमंत स्टेडियमवर अवतरले
झी महाराष्ट्र कुस्ती दंगलनिमित्त खास हनुमानाची मूर्ती पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये उभारण्यात आली आहे. हनुमानाच्या या भव्य व सुंदर मूर्तीला संदीप सावंत यांनी आकार दिलाआहे. २७ फूट ऊंच अशी ही मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे. मारुतीची ही मूर्ती फायबरपासून बनवण्यात आली आहे. अशावेळी या मूर्तीच्या निमित्ताने झी महाराष्ट्र कुस्तीदंगलचे साक्षीदार बनत कुस्तीवीरांना आशीर्वाद देण्यासाठी साक्षात हनुमंत स्टेडियमवर अवतरले आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही!