गोवा । गतउपविजेता एफसी गोवा बुधवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपली मोहिम सुरु करेल. गेल्या दोन मोसमांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे गोवा संघ स्थिरावला आहे. दुसरीकडे चेन्नईयीनने पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे गोव्यासमोर किती आव्हान निर्माण होतात याची उत्सुकता असेल.
गेल्या मोसमात चेन्नईयीनचा संघ तळात फेकला गेला. विजेतेपद राखण्याची त्यांची मोहीम साफ फसली. मोसमापूर्वी त्यांनी पुनर्बांधणी केली. त्यामुळे मागील मोसमातील अपयश निव्वळ अपवाद ठरल्याचे दाखवून देण्याचा त्यांना प्रयत्न असेल.
विशेष म्हणजे दोन्ही प्रशिक्षक तिसऱ्या मोसमासाठी कायम आहेत. गोव्याने सर्जिओ लॉबेरा, तर चेन्नईयीनने जॉन ग्रेगरी यांना कायम ठेवले आहे. गोव्याचा संघ अपेक्षेप्रमाणे स्थिरावलेला आहे याचे कारण महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडू संघाकडे कायम राहिले आहेत.
फेरॅन कोरोमीनास, ह्युगो बुमुस, अहमद जाहौह आणि एदू बेदीया या सर्वांचाही तिसरा मोसम आहे. मंदार राव देसाई, सेरीटॉन फर्नांडीस, लेनी रॉड्रीग्ज, जॅकीचंद सिंग अशा भारतीय खेळाडूंना लॉबेरा यांची कार्यपद्धत ठाऊक आहे.
लॉबेरा यांनी सांगितले की, पहिल्या सामन्यापूर्वीची तयारी फार छान झाली आहे. खेळाडूंची तंदुरुस्ती चांगली आहे. ते कसलेले व्यावसायिक आहेत. मोसमपूर्व तयारीविषयी मी फार समाधानी आहे, पण पहिला सामना सर्वांत महत्त्वाची गोष्ट असेल. आम्ही घरच्या मैदानावर चांगला सामना खेळू आणि तीन गुण मिळविण्याचा प्रयत्न करू.
चेन्नईयीनने गेल्या मोसमातील धक्यानंतर पुनर्बांधणी केली आहे. एलि साबिया याचा अपवाद वगळता ग्रेगरी यांनी परदेशी खेळाडूंची फळी पूर्ण बदलली आहे. त्यांनी सहा नवे परदेशी चेहरे आणले आहेत.
भारतीय खेळाडूंच्या ताफ्यातही काही बदल झाले आहेत. विशाल कैथ, लालियनझुला छांगटे, एडविन वॅन्सपॉल आणि रहिम अली संघात आले आहेत.
ग्रेगरी यांनी सांगितले की, आमच्याकडे जवळपास पूर्ण नवा संघ आहे. गेल्या मोसमात सात परदेशी खेळाडू होते, ज्यात आम्ही सहा बदलले आहेत. स्थानिक खेळाडूंविषयी आम्ही खुप आनंदी आहोत. परदेशी खेळाडू चौथ्या मोसमाप्रमाणेच प्रभाव पाडतील अशी आम्हाला आशा आहे.
घरच्या मैदानावर एफसी गोवाचे पारडे जड असेल, पण चेन्नईयीनच्या सुदैवाने अहमद जाहौह उपलब्ध नसेल. गेल्या मोसमात बेंगळुरू एफसीविरुद्धच्या अंतिम फेरीत त्याला लाल कार्डला सामोरे जावे लागले होते.
ग्रेगरी यांनी सांगितले की, सर्जिओ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा सपोर्ट स्टाफ जवळपास तोच आहे. त्यांनी एक-दोन बदल केले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ सरस बनला आहे. आमच्यासाठी सामना अवघड असेल. आमच्या संघाला आणि खास करून परदेशी खेळाडूंना परिस्थितीशी चटकन जुळवून घ्यावे लागेल. गोव्यामधील सामन्याइतकी खडतर अवे लढत दुसरी कोणती असत नाही.
पुनर्बांधणी केलेला संघ 2017-18 मधील जिगरबाज दृष्टिकोन प्रदर्शित करेल आणि सकारात्मक सुरवात करेल अशी ग्रेगरी यांना आशा आहे, तर लॉबेरा यांचे आतापर्यंत हुलकावणी देणारे आयएसएल जेतेपद पटकावण्याचे ध्येय असेल.








