विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत मुंबई संघाचे नेतृत्व करणारा फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या फलंदाजीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या अपयशामुळे त्याच्या फलंदाजीवर टिका केली गेली होती. त्यानंतर त्याला संघातून बाहेर काढत शूबमन गिलला संघात संधी देण्यात आली होती. या कठीण काळाचा त्याने कसा सामना केला? याबाबत त्याने खुलासा केला आहे.
पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये कसोटी पदार्पणात शतक झळकावले होते. परंतु त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियन संघाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी त्याला अडचणीमध्ये टाकले होते. पहिल्या सामन्यात त्याला ० आणि ४ धावा करता आल्या. आपल्या फ्लॉप खेळीमुळे संघाबाहेर झाल्यानंतर पृथ्वी शॉने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतले होते आणि त्याला अश्रू अनावर झाले होते. याबाबतची माहिती त्याने स्वतः दिली आहे.
पृथ्वी शॉने एका मुलाखतीत म्हटले की, “ज्याप्रकारे मी बाद झालो त्यांनतर मी स्वतःलाच खूप प्रश्न विचारत होतो. मी कुठे चुकत आहे? मला काय करायला हवं काय, काय नाही करायला हवं? त्यानंतर मी आरशासमोर उभा राहिलो आणि स्वतःलाच म्हटले की, मी इतकाही वाईट फलंदाज नाहीये ज्याप्रकारे मी बाद झालो आहे.”
अश्रू झाले होते अनावर
एडिलेड कसोटी सामन्यात २ वेळा बोल्ड झालेल्या पृथ्वी शॉने म्हटले की, “ज्यावेळी मी कसोटी सामन्यातून बाहेर झालो होतो. त्यावेळी मी खूप तणावात होतो. मला असे वाटू लागले होते की, मी जगातील सर्वात वाईट खेळाडू आहे. परंतु मला आनंद होता की, माझा संघ चांगली कामगिरी करत आहे. संघाबाहेर होण्याचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. मी हॉटेलच्या रूममध्ये गेलो आणि मला अश्रू अनावर झाले होते. मला वाटत होते की माझ्यासोबत काहीतरी वाईट होत आहे आणि मला यामागचे कारण शोधायचे होते.”
प्रशिक्षकांनी निदर्शनास आणून दिली माझी चूक
“एडीलेड कसोटीनंतर रवी (रवी शास्त्री) आणि विक्रम (विक्रम राठोड) सर यांनी मला सांगितले की, माझी नेमकी कुठे चूक होत आहे. ज्या गोष्टींवर मला नेटमध्ये जाऊन मेहनत घ्यावी लागेल. एडिलेड कसोटीत ज्याप्रकारे मी बाद झालो त्यामध्ये माझी बॅकलिफ्ट शरीरापासून थोडी दूर जात होती. माझी बॅट जेव्हा खाली येत होती, तेव्हा ती शरीरापासुन थोडी दूर जात होती. या गोष्टीवर मी खूप मेहनत घेतली आणि बॅट खाली घेऊन येताना शरीराच्या जवळ आणण्याच्या प्रयत्न केला. मला हेच करायचे होते, पण त्यावेळी माझ्याकडून होत नव्हते,” असे शेवटी शॉ म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
वामिकाला २ महिने पूर्ण, विराट-अनुष्काने ‘खास’ अंदाजात केले सेलिब्रेशन; फोटो व्हायरल
मिताली राजचा ‘दशहजारी’ विक्रम! कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला न जमलेला रेकॉर्ड केला नावावर
टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर