बुधवारी (11 डिसेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची स्पर्धेची चौथी उपांत्यपूर्व फेरी मुंबई आणि विदर्भ यांच्यात खेळली गेली. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या मुंबईनं अप्रतिम कामगिरी करत 6 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भानं 6 गडी गमावून 221 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, मुंबईनं चार चेंडू शिल्लक असताना 4 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं. मुंबईकडून या विजयाचा हिरो ठरला अजिंक्य रहाणे! त्यानं 45 चेंडूत 85 धावा ठोकल्या.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाची सुरुवात चांगली झाली होती. करुण नायर आणि अथर्व तायडे यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. नायर 15 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. यानंतर 65 धावांवर संघाला दुसरा धक्का बसला. त्यानंतर तायडे आणि अपूर्व वानखेडे यांनी मोर्चा सांभाळत मुंबईच्या गोलंदाजांना धारेवर धरलं. या दोघांनी मिळून संघाची धावसंख्या 140 च्या पुढे नेली. तायडे 41 चेंडूत 66 धावा करून बाद झाला. वानखेडे (51) यानंही उत्तम अर्धशतक केलं. अखेरच्या षटकांत शुभम दुबेनं स्फोटक शैलीत फलंदाजी करत 19 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर विदर्भानं 20 षटकांत 6 गडी गमावून 221 धावा केल्या. मुंबईकडून अथर्व अंकोलेकर आणि सूर्यांश शेडगे यांनी 2-2 बळी घेतले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. शॉनं शानदार फलंदाजी करत 26 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावा ठोकल्या. त्याचवेळी अनुभवी अजिंक्य रहाणेनं आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवत 45 चेंडूत 85 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 3 षटकार आले.
हे दोघे बाद झाल्यानंतर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव (9) आणि श्रेयस अय्यर (5) फ्लॉप ठरले. अखेर शिवम दुबेनं 22 चेंडूंत नाबाद 37 धावांची दमदार खेळी केली तर सुर्यांश शेडगेनं 12 चेंडूंत 1 चौकार व 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 36 धावा ठोकल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईनं 4 चेंडू बाकी असताना 6 गडी राखून सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.
हेही वाचा –
गाबामध्ये भारतीय खेळाडू करू शकतात अनेक विक्रम! जसप्रीत बुमराहकडे मोठा पल्ला गाठण्याची संधी
हार्दिक पांड्याची घातक गोलंदाजी, संघाची उपांत्य फेरीत धडक; मोहम्मद शमीनेही मोठा विक्रम केला!
स्मृती मंधानाच्या शतकानंतरही भारताच्या हाती निराशा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा व्हाईटवॉश