दिल्ली। आयपीएल 2019 मध्ये शनिवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात रोमांचकारी सामना पार पडला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला.
या सामन्याचा सामनावीर पुरस्कार युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉला देण्यात आला आहे. त्याने दिल्लीकडून खेळताना 55 चेंडूत 99 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र त्याचे या मोसमातील आयपीएलमधील पहिले शतक 1 धावेने थोडक्यात हुकले. त्याला 99 धावांवर असताना लॉकी फर्ग्यूसनने बाद केले.
त्यामुळे आयपीएलमध्ये 1 धावेने शतक हुकणारा तो केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज सुरेश रैना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध 2013 मध्ये उप्पल येथे खेळत असताना डाव संपल्याने 99 धावांवर नाबाद राहिला होता.
तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 2013 मध्येच फिरोजशहा कोटला स्टेडीयमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीचे नाव दिल्ली डेअरडेविल्स) विरुद्धच्या सामन्यात 99 धावांवर धावबाद झाला होता.
शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 185 धावा केल्या होत्या. कोलकताकडून कर्णधार दिनेश कार्तिकने 36 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच अष्टपैलू आंद्रे रसलने तुफानी फटकेबाजी करतना 28 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने 62 धावांची खेळी केली. दिल्लीकडून हर्षेल पटेलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
कोलकताने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना शॉ बरोबरच दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 43 धावा केल्या. पण दिल्लीलाही 20 षटकात 6 बाद 185 धावाच करता आल्या. त्यामुळे बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 10 धावा केल्या. पण कोलकताला फक्त 1 बाद 7 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–एन्गिडी ऐवजी चेन्नई सुपर किंग्स संघात सामील होणार हा क्रिकेटपटू…
–पंजाबविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्माला झाला लाखो रुपयांचा दंड…






