मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यानं पृथ्वी शॉला विजय हजारे करंडक संघातून वगळल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. तो वारंवार शिस्त मोडत असल्याचं एमसीए अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एमसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं की, खराब फिटनेस, वृत्ती आणि शिस्तीमुळे संघाला कधीकधी त्याला (पृथ्वीला) मैदानात लपवावं लागलं. पृथ्वी शॉनं 16 सदस्यीय विजय हजारे ट्रॉफी संघात स्थान न मिळाल्यानंतर सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे, तो नुकत्याच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता.
एमसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, “सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आम्ही दहा क्षेत्ररक्षकांसह खेळत होतो, कारण आम्हाला शॉला लपवावं लागलं. चेंडू त्याच्या जवळून जायचा मात्र तो त्याला पकडू शकत नव्हता.” एमसीए अधिकारी पुढे म्हणाले, “फलंदाजी करतानाही पृथ्वीला चेंडूपर्यंत पोहोचण्यात अडचण येत होती. त्याचा फिटनेस, शिस्त आणि वृत्ती वाईट आहे. वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम असू शकत नाहीत. संघातील वरिष्ठ खेळाडूही त्याच्या या वृत्तीबद्दल तक्रारी करू लागले होते.”
रिपोर्टनुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान शॉ नियमितपणे सराव सत्र चुकवत असे. तो रात्रभर बाहेर राहिल्यानंतर सकाळी सहा वाजता टीम हॉटेलमध्ये पोहोचायचा. अधिकाऱ्यानं सांगितलं की, “मैदानाबाहेरील कृत्यांमुळे चर्चेत असलेला शॉ आपल्या प्रतिभेला न्याय देत नाहीये. अशा सोशल मीडिया पोस्टमुळे त्याचा काहीही फायदा होणार नाही.” याआधी ऑक्टोबरमध्येही याच कारणांमुळे शॉला मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आलं होतं, हे विशेष.
पृथ्वी शॉ गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा लिलावातही अनसोल्ड राहिला होता. त्यानं त्याची बेस प्राईज कमी करून 75 लाख रुपये ठेवली होती. मात्र तरीही कोणत्याही संघानं त्याच्यावर विश्वास दाखवला नाही.
हेही वाचा –
निवृत्तीनंतर 2 महान दिग्गजांचा फोन आल्यावर काय म्हणाला अश्विन? “मला हृदयविकाराचा झटका…”
टीम इंडियाने रचला इतिहास, मानधना-घोषच्या जोरावर तोडला सर्वोच्च टी-20 धावांचा विक्रम
बांग्लादेशने रचला इतिहास, टी20 मध्ये वेस्ट इंडिजचा प्रथमच व्हाईटवॉश