इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उर्वरित चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघात पहिल्यांदाच पृथ्वी शॉला आणि हनुमा विहारी या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर पहिल्या तीन सामन्यांसाठी संधी देण्यात आलेल्या मुरली विजय आणि कुलदीप यादवला वगळण्यात आले आहे.
हे दोन बदल वगळता भारतीय संघ कायम ठेवण्यात आला आहे. भारत या मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे. भारताने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमधील पहिले दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे.
शॉने मागिल काही महिन्यांपासून चांगली कामगिरी केली आहे. तसेच याचवर्षी त्याच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला आहे.
त्याचबरोबर नुकत्याच भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात हनुमा विहारी आणि शॉने दमदार कामगिरी केली होती. शॉ या दौऱ्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. तर विहारी हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
शॉने या दौऱ्यात 8 सामन्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 603 धावा केल्या आहेत. तर विहारीने 8 सामन्यात 410 धावा करताना 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत.
या दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. शॉने 14 प्रथम श्रेणी सामन्यात 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. यात त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.
तर विहारीने 63 प्रथम श्रेणी सामन्यात 15 शतके आणि 24 अर्धशतकांसह 59.79 च्या सरासरीने 5142 धावा केल्या आहेत.
मात्र विजय आणि कुलदीपला त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे संघातील स्थान गमवावे लागले आहे. विजयने इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटीत मिळून 26 धावा केल्या होत्या तर कुलदीपला संधी मिळालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याला एकही विकेट्स घेता आली नाही.
पण कुलदिपला आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दोन चार दिवसीय कसोटी सामन्यांसाठी भारतीय अ संघात संधी देण्यात आली आहे.
भारताचा इंग्लंड विरुद्ध चौथा कसोटी सामना 30 आॅगस्टपासून आणि पाचवा कसोटी सामना 7 सप्टेंबर पासून सुरु होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा , हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रीत बूमराह, शार्दुल ठाकुर, हनुमा विहारी.
असा आहे आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध दोन चार दिवसीय कसोटी सामन्यांसाठी भारतीय अ-
श्रेयश अय्यर, मयंक अगरवाल, आर समर्थ, ए इश्वरण, अंकित बावने, शुभमन गिल, केएस भरत, शहाबाज नदीम, कुलदीप यादव, के गॉथम, रजनीश गुरबानी, नवदिप सैनी, अंकित राजपुत, मोहम्मद सिराज.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या विक्रमालाही धक्का
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचे संपुर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल होणार मुंबईत
–भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम