आयपीएलमध्ये काल (25 सप्टेंबर) रोजी झालेल्या सातव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा 44 धावांनी पराभव केला. या सामन्यात दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने 43 चेंडूत 64 धावांची अप्रतिम खेळी केली. यादरम्यान त्याने नऊ चौकार आणि एक षटकारही लगावला. या खेळीत त्याच्या फलंदाजीत परिपक्वताही स्पष्ट दिसत होती. या शानदार खेळीमुळे पृथ्वीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
या खेळीमुळे त्याने आयपीएलमध्ये वयाची 21 वर्षे पूर्ण करण्याआधी सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या यादीत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज संजू सॅमसनला मागे टाकले आहे. तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. वास्तविक, पृथ्वी शॉचे आयपीएलमधील हे पाचवे अर्धशतक आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर दिल्लीचा डावखुरा स्फोटक फलंदाज रिषभ पंत आहे. त्याने वयाची 21 वर्षे पूर्ण करण्याआधी 9 अर्धशतके आयपीलमध्ये केली होती. तसेच या यादीत पंत आणि शॉच्या पाठोपाठ शुबमन गिल, अय्यर आणि सॅमसन हे खेळाडू संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या तिघांनीही वयाची 21 वर्षे पूर्ण करण्याआधी आयपीएलमध्ये प्रत्येकी 4 अर्धशतके केली होती.
सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर 20 वर्षीय पृथ्वी म्हणाला, “सुरुवातीला तुम्हाला खेळपट्टी कशी आहे, ते पाहावे लागते, कारण परिस्थिती आणि खेळपट्टीनुसार खेळणे जास्त महत्वाचे असते. मी मागील हंगामातही चांगले फटके खेळत होतो. परंतु फलंदाजी करतांना मी काही चुका करीत होतो. यावेळी मैदानी फटके खेळण्याचे ठरविले होते. मला माझ्या या डावाची हायलाईट पाहायला आवडेल. मी आणखी चांगले कसे करू शकतो, हे मला समजून घ्यायचे आहे. फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली होती.”