मागील अनेक वर्षांपासून युवा फलंदाज पृथ्वी शॉ त्याच्या खेळींमुळे चर्चेत आहे. तो सर्वप्रथम १३ वर्षांचा असताना हॅरिस शिल्ड एलिट डिविजनमध्ये केलेल्या ५४६ धावांच्या खेळीमुळे प्रकाशझोतात आला होता. त्यानंतरही त्याने मुंबई संघाकडून खेळताना मोठ्या खेळी उभारल्या. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली २०१८ ला १९ वर्षांखालील विश्वचषकही भारतीय संघाने जिंकला.
त्याच्या या कामगिरीमुळे त्याला भारताच्या वरिष्ठ संघातही २०१८ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी स्थान मिळाले. त्यानेही त्याची निवड सार्थ ठरवताना पदार्पणाच्या डावातच शतकी खेळी केली. तसेच पहिल्याच कसोटी सामन्यात मालिकावीर पुरस्कारही मिळवला. शॉ हा दुलिप ट्राॅफी, रणजी ट्राॅफी आणि कसोटी पदार्पणात शतक करणारा भारतातील पहिलाच क्रिकेटपटू आहे.
कमी वयातच एवढी प्रतिभा दाखवल्याचे त्याची तुलना अपसुकच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी सुरु झाली. सचिननेही कमी वयात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले होते. तसेच सचिनही देशांतर्गत क्रिकेट मुंबईकडून खेळला आहे. त्याचबरोबर सचिनही विनोद कांबळीसह शालेय क्रिकेटमध्ये केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीमुळे प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी सचिनचे १३-१४ वर्षेच होते. त्यामुळे सचिन आणि शॉच्या बाबतीत काही गोष्टींमध्ये साम्य असले तरी काही कारणे अशी आहेत, ज्यामुळे शॉ हा पुढचा सचिन होऊ शकत नाही. अशाच कारणांचा घेतलेला हा आढावा –
१. दोघांचाही काळ वेगवेगळा –
सचिन आणि शॉ या दोघांचाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काळ वेगळा आहे. सचिनने ज्यावेळी १९८९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड संघांचे क्रिकेटमध्ये वर्चस्व होते. हे संघ बलाढ्य म्हणून ओळखले जायचे. तसेच त्यांची फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही तगडी होती. गोलंदाजीचा विचार करता पाकिस्तानचा संघही अव्वल होता. अशा संघांविरुद्ध सचिनने मोठ्या खेळी केल्या आहेत.
तसेच सचिननेही शॉ प्रमाणे किशोरवयातच पहिले शतक केले होते. पण सचिनने हे शतक इंग्लंडमध्ये केले होते. त्यादृष्टीने विचार करायचा झाल्यास शॉ सध्याच्या काळात खेळत असून सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड संघासह भारताचे वर्चस्व आहे. पण त्याचबरोबर सचिनच्या काळातील गोलंदाजांचा आणि सध्याच्या गोलंदाजी आक्रमणाचा विचार करता त्यावेळीचे गोलंदाज भेदक आणि अधिक संघर्ष करायला लावणारे होते.
तसेच शॉचे २०१८ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यातील शतकही तितकेच महत्त्वाचे असले तरी सचिनच्या पहिल्या शतकाच्या तुलनेत विचार करायचा झाला तर शॉने भारतात त्याला अनुकुल असणाऱ्या परिस्थितीत शतक केले होते.
तसेच सचिनला पदार्पणाच्या सामन्यात मोठी खेळी करता आली नसली तरी त्याने पुढे त्याच्या कामगिरीमुळे पदार्पणानंतर काही दिवसांतच संघातील स्थान पक्के केले होते. तसेच त्याने कसोटीत पदार्पण केल्यानंतर लगेचच १ महिन्याने वनडेत पदार्पण केले होते. शॉच्या बाबतीत मात्र काही गोष्टी विरोधात गेल्या.
त्याला पदार्पणाच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतू त्याला दुखापत झाली. तसेच त्यानंतर डोप टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळल्याने काही महिने त्याच्यावर बंदी होती. त्यामुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. पण नंतर त्याने एक-दीड वर्षाने २०१९-२० च्या न्यूझीलंड दौऱ्यातून पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले. तसेच त्याने या दौऱ्यातील वनडे संघातही स्थान मिळवले. पण पुनरागमनानंतर त्याच्याकडून अपेक्षित असलेली कामगिरी पहायला मिळाली नाही. त्यामुळे सध्यातरी २ वेगवेगळ्या काळाचा विचार करता सचिन आणि शॉमध्ये तुलना होऊ शकत नाही.
२. दोघांच्याही फलंदाजीची शैली वेगवेगळी –
सचिन आणि शॉ दोघेही मुंबई संघातून किशोरवयातच पुढे आले असले तरी त्या दोघांच्याही शैलीमध्ये फरक आहे. सचिन हा खूप मोठे फटके खेळणारा आणि आक्रमक खेळाडू नाही. तो बऱ्याचदा खेळपट्टीवर स्थिर होऊन शांततेत खेळ करणारा खेळाडू आहे. तसेच परिस्थिती असेल आणि चेंडू जर बॅटवर चांगला येत असेल, तरच तो मोठे फटके खेळण्याचा धोका पत्करतो.
पण शॉची फलंदाजी शैली सचिनपेक्षा वेगळी आहे. त्याची शैली थोडीफार विरेंद्र सेहवागच्या शैलीशी मिळती जुळती आहे. सेहवागप्रमाणेच शॉ देखील आक्रमक फलंदाजी करतो. त्यालाही पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचे असते. त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात केलेल्या शतकावेळीही पहायला मिळाली आहे.
3. वेगवेगळी फलंदाजी क्रमवारी –
संघातील फलंदाजीचा क्रमांक एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरतो. जसे सेहवाग आणि रोहितने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सुरुवात केली असली तरी ते सलामीवीर म्हणून अधिक यशस्वी झाले. सचिन आणि शॉ च्या बाबतीत या दृष्टीने विचार करायचा झाल्यास सचिन कसोटीत चौथ्या क्रमांकावर अधिक खेळला तसेच वनडेत तो सलामीला अधिक सामने खेळला.
पण शॉ हा प्रामुख्यानेच सलामीवीर आहे. तसेच अजून त्याला मधल्या फळीत फलंदाजी करताना फार पाहाण्यात आले नाही. तसेच शॉने नुकतेच वनडेत सलामीवीर म्हणून पदार्पण केले आहे. त्यामुळे वनडेत सलामीवीर म्हणून त्याची आणि सचिनची तुलना इतक्या लवकर करणे चुकीचे ठरेल. त्यामुळे सध्यातरी त्यांच्या फलंदाजीतील क्रमवारीचा विचार करता त्यांच्यात तुलना होऊ शकत नाही.
४. नुकतेच शॉचे झाले आहे आंतरराष्ट्रीय पदार्पण –
२०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या शॉने आत्तापर्यंत केवळ ४ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने २२ प्रथम श्रेणीचे सामने खेळले आहेत. त्याचबरोबर ३३ अ दर्जाचे सामने खेळले आहेत. तर सचिनने तब्बल २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असून आत्तापर्यंत कसोटीत २०० सामन्यात १५९२१ धावा आणि वनडेत ४६३ सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.
त्यामुळे सचिन सारखी महानता मिळवण्यासाठी शॉला आधी कामगिरीतील सातत्य आणि फिटनेस तेवढा ठेवावा लागेल. त्यामुळे सध्यातरी सचिनची आणि शॉची तुलना करणे घाईचे ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी –
एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड , थेट विश्वचषकाला पात्र
गर्लफ्रेंड की शेजारी? चहलच्या प्रश्नाने गोंधळला शमी