---Advertisement---

बड्डे बॉय पृथ्वीचा धमाका! झंझावाती अर्धशतकासह मिळवून दिला मुंबईला दणदणीत विजय

On: मंगळवार, नोव्हेंबर 9, 2021 3:24 PM
---Advertisement---

एकीकडे यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर झाला आहे. तर भारतात सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा ऋतुराज गायकवाडने अर्धशतकांची हॅटट्रिक केल्यानंतर आता पृथ्वी शॉ देखल ॲक्शनमध्ये आला आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने तुफानी खेळी करत मुंबई संघाला धमाकेदार विजय मिळवून दिला आहे.

पृथ्वी शॉ मंगळवारी आपला २२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म ९ नोव्हेंबर १९९९ रोजी झाला होता. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने बडोदा संघाविरुद्ध हल्लाबोल केला. त्याने ६३ चेंडूंचा सामना करत ८३ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. जर चौकार आणि षटकार पाहायला गेलं तर त्याने अवघ्या १० चेंडुंमध्ये ४८ धावा चोपल्या. त्याच्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबेच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबई संघाला २० षटकां अखेर २ गडी बाद १९३ धावा करण्यात यश आले.

मुंबईचे फलंदाज चमकले

बडोदा संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई संघाने प्रथम फलंदाजी केली. या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांनी डावाची सुरुवात केली होती.दोघांनी मिळून अप्रतिम फलंदाजी केली आणि १५१ धावांची भागीदारी केली.अजिंक्य रहाणेने या डावात ४५ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉ च्या ८३ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने १९३ धावांचा डोंगर उभारला.

बडोदा संघ धावांचा पाठलाग करण्यात ठरला अपयशी 

या सामन्यात विजय मिळवण्यासाठी बडोदा संघाला १९४ धावांचा पाठलाग करायचा होता. परंतु त्यांना अवघ्या १११ धावा करता आल्या. मुंबई संघाने हा सामना ८२ धावांनी आपल्या नावावर केला. तसेच मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना तनुष कोटीयानने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात १६ धावा देत ४ गडी बाद केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---