गतवर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात उत्कृष्ट कामगिरी करत आयपीएल २०२० स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेमध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. यानंतर काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पृथ्वी शॉवर टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. आता शॉने याबाबत आपले मत मांडले आहे.
पृथ्वी शॉने युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत निराशाजनक कामगिरी करत १३ सामन्यात अवघ्या २२८ धावा केल्या होत्या. त्यामुळे रिकी पाँटिंग यांनी शॉवर टीका केली होती. आता शॉने आपले मत मांडत म्हटले आहे की, “बॉस (रिकी पाँटिंग) परत आले आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. मैदानात ते बॉससारखे वावरत असतात, तर मैदानाबाहेर ते मित्रासारखे वागतात. मला वाटतं की ते खूप चांगले व्यक्ती आहेत. हे वर्ष कसं जात ते पाहू. तसेच जेव्हा ते बोलत असतात तेव्हा बॅकग्राऊंडला शाहरुख खानचं ‘चक डे इंडिया’ गीत वाजवलं पाहिजे.”
https://twitter.com/DelhiCapitals/status/1379469286213787649?s=20
काय म्हणाले होते पाँटिंग?
दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रशिक्षक पाँटिंग शॉबद्दल बोलताना म्हणाले होते की, “गतवर्षी शॉचा त्याच्या फलंदाजीबद्दल अनोखा सिद्धांत होता. जेव्हा त्याच्या धावा होत नव्हत्या, तेव्हा त्याला फलंदाजी करायची नव्हती आणि जेव्हा त्याच्या धावा होत होत्या तेव्हा त्याला नेहमीच फलंदाजी करायची असायची. त्याने चार-पाच सामन्यांत १० पेक्षाही कमी धावा केल्या होत्या. तेव्हा मी त्याला म्हटलो होतो की आपण नेट्समध्ये जाऊन समस्या दूर करायला हवी. त्यावेळी त्याने माझ्या डोळ्यात पाहात म्हटले होते की नाही तो फलंदाजी करणार नाही. मला ही गोष्ट अजिबातच समजली नाही.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले होते की, “शॉ कदाचीत बदलला असेल. मला माहित आहे मागील काही महिन्यांत त्याने स्वत:वर खुप काम केले आहे. कदाचीत त्याचा सिद्धांत बदलला असेल. आशा आहे की त्याच्या फलंदाजी सुधारणा झाल्या असतील. कारण त्याच्याकडून आम्ही सर्वोत्तम कामगिरी करुन घेऊ शकलो तर तो एक चांगला खेळाडू बनू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा गुरुजी! तीन असे प्रशिक्षक, ज्यांनी संघाला कमीत कमी दोनदा जिंकून दिलीय आयपीएल ट्रॉफी
‘विराटसेना’ पहिल्याच सामन्यात मुंबईकरांशी करणार दोन हात, जाणून घ्या आरसीबीचे संपूर्ण वेळापत्रक






