इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील क्वालिफायर १ चा सामना रविवारी (१० ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने ४ विकेट्सने विजय मिळवत नवव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा जुना आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याच्या छोट्याश्या मॅचविनिंग खेळीनंतर सोशल मीडियावर अनेक जण धोनीचे कौतुक करत आहेत. या सामन्यात दिल्लीकडून खेळणारा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यानेदेखील धोनीच्या या खेळीनंतर प्रतिक्रिया दिली.
धोनीचा पुन्हा एकदा ‘फिनिशिंग टच’
या सामन्यात चेन्नईला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार मारत चेन्नईला विक्रमी नवव्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले. धोनी या सामन्यात चेन्नईला ११ चेंडूत २४ धावांची गरज असताना मैदानात आला होता. त्याने ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद १८ धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर अनेकांनी जुना धोनी पाहिला मिळाल्याचे म्हटले.
काय म्हणाला पृथ्वी
पहिल्या क्वालिफायरमध्ये दिल्लीला तुफानी सुरुवात देणारा पृथ्वी शॉ सामन्यानंतर धोनीच्या खेळीविषयी म्हणाला,
“एमएस धोनी हा वेगळाच आहे. आपण त्याला अनेकदा सामना संपवताना पाहिले आहे. त्याने असे अनेकदा केले असून, हे काही नवीन नाही. जेव्हा तो अशी फलंदाजी करतो तेव्हा खतरनाक भासतो. मी स्वतःला भाग्यशाली मानतो की, त्याला एक फलंदाज आणि एक नेता म्हणून पाहू शकतो. त्याने खेळ आमच्यापासून हिरावून घेतला.”
शॉ याने या सामन्यात ३४ चेंडूत ६०धावांची वेगवान खेळ केली होती.
चेन्नईचा अंतिम फेरीत प्रवेश
या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ व कर्णधार रिषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर १७२ धावा बनविल्या होत्या. प्रत्युत्तरात, फाफ डू प्लेसिस पहिल्याच षटकात बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथप्पा यांनी दुसऱ्यासाठी ११० धावांची भागीदारी केली. दोघांनीही यावेळी वैयक्तिक अर्धशतके ठोकली. धोनीने अखेरीस ताबडतोब फलंदाजी करत संघाला अखेरच्या षटकात सामना जिंकून दिला.






