क्रिकेट हा फार अजब खेळ आहे. येथे एखादा खेळाडू एका रात्रीतून स्टार बनतो, तर एखादा खेळाडू हिरो पासून झिरो बनायला देखील अजिबात वेळ लागत नाही. असंच काहीसं भारताचा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ सोबत घडलं आहे.
एकेकाळी पृथ्वीची तुलना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी व्हायची. मात्र आता तो पूर्णपणे जमिनीवर आला आहे. गेल्या काही काळापासून पृथ्वीच्या करिअरमध्ये खूप उतार आला आहे. प्रथम त्यानं भारतीय संघातील आपलं स्थान गमावलं. त्यानंतर त्याला रणजी ट्रॉफीतून बाहेर करण्यात आलं. आता पृथ्वीला आयपीएलमध्येही भाव मिळालेला नाही. तो आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिला!
पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. त्यानं 2018 मध्ये दिल्लीसाठी आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यानं शेवटचा सामना 2024 मध्ये खेळला. मेगा लिलावापूर्वी दिल्लीनं पृथ्वीला रिलिज करण्याचा निर्णय घेतला. लिलावात कोणत ना कोणता संघ पृथ्वीवर बोली लावेल, असं मानलं जात होतंं. मात्र तसं झालं नाही. पृथ्वीची बेस प्राईज 75 लाख असून देखील त्याच्यावर एकाही संघानं बोली लावली नाही.
पृथ्वी शॉनं भारतासाठी शेवटचा सामना 2021 मध्ये खेळला होता. कसोटी पदार्पणातच शतक ठोकणारा हा स्फोटक फलंदाज आपल्या कामगिरीत सातत्य राखू शकला नाही. तो त्याच्या खेळापेक्षा फिटनेस आणि मैदानाबाहेरील वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. तो लिलावात अनसोल्ड राहण्याचं हे एक मोठं कारण आहे. प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केल्यामुळे 2019 मध्ये त्याच्यावर काही महिन्यांची बंदी देखील लावण्यात आली होती.
पृथ्वी शॉनं आयपीएलमध्ये 79 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या बॅटमधून 1892 धावा निघाल्या. त्याच्या नावे 14 अर्धशतकं आहेत. पृथ्वीनं भारतीय संघासाठी 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला आहे.
हेही वाचा –
सीएसकेसाठी मैदान गाजवणारा अजिंक्य रहाणे ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार!
IPL Mega Auction; 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर लागली कोटींची बोली, ‘या’ संघातून खेळताना दिसणार
IPL Mega Auction; धाकटा भाऊ विकला गेला, पण सरफराज खान ठरला अनसोल्ड!