दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला. या सामन्यादरम्यान दिल्लीचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ आणि कर्णधार रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. याबरोबरच त्यांनी एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. दिल्लीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा केल्या होत्या.
या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. शॉने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. पण शिखर मात्र लवकर बाद झाला. त्याने केवळ ७ धावा केल्या. तर, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलही स्वस्तात माघारी परतले. पण, असे असतानाही दुसरी बाजू पृथ्वी शॉने भक्कमपणे सांभाळली होती.
त्याने केवळ २७ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. याबरोबर तो यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना युएईत अर्धशतक करणारा दिल्लीचा पहिला खेळाडू ठरला. विषेश म्हणजे याच सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर पंतनेही अर्धशतक पूर्ण केले. शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तर, पंत ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला. आयपीएल २०२१ हंगामातील दुसरा टप्पा युएईमध्ये होत आहे.
त्यामुळे, आयपीएल २०२१ हंगामातील युएई टप्प्यात दिल्लीकडून सर्वोच्च धावा करण्याच्या बाबतीत शॉ आणि पंत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. विशेष म्हणजे यावर्षी युएईमध्ये दिल्लीकडून अर्धशतके केवळ या दोघांनाच करता आली आहेत.
आयपीएल २०२१ हंगामातील युएई टप्प्यात दिल्लीकडून सर्वोच्च धावा करणारे फलंदाज
६० धावा – पृथ्वी शॉ (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)
५१* धावा – रिषभ पंत (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)
४८ धावा – पृथ्वी शॉ (विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
४७* धावा – श्रेयस अय्यर (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद)
शॉचे चेन्नईविरुद्ध दोन वर्षातील तिसरे अर्धशतक
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शॉने त्याचे दमदार प्रदर्शन या सामन्यातही कायम ठेवले. विशेष म्हणजे आयपीएल २०२० पासून पाचव्यांदा दिल्ली आणि चेन्नई संघ आमने-सामने आले होते. या ५ सामन्यांपैकी तिसऱ्यांदा शॉने अर्धशतक झळकावले आहे. त्याने २०२१ आयपीएलच्या चेन्नईविरुद्ध मुंबईला झालेल्या सामन्यांत ७२ धावांची खेळी केली होती. तसेच त्यापूर्वी त्याने २०२० च्या आयपीएल हंगामात दुबईमध्येच खेळताना ६४ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू
एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम
भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?