भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेत पृथ्वी शॉ याला सलामीची भूमिका देण्यात आली होती. परंतु तो अपयशी ठरला होता. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीला पुढील सामन्यात संघात स्थान मिळाले नाही. त्याच्याऐवजी शुबमन गिलला संधी देण्यात आली होती. या मालिकेतून परतल्यानंतर त्याने भारतीय दिग्गज फलंदाजाची भेट घेतली असल्याचा खुलासा केला आहे.
पृथ्वी शॉला ऍडलेडमध्ये झालेल्या दिवस रात्र कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु तो पहिल्या डावात ० आणि दुसऱ्या डावात ४ धावा करत बाद झाला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेर काढत शुबमन गिलला संधी देण्यात आली होती. शॉच्या फलंदाजीमध्ये तांत्रिक चुका आढळून येत होत्या. म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर शॉने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली होती.
सचिनने दिलेला मोलाचा सल्ला
शॉने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मी माघारी परतल्यानंतर सचिन सरांची भेट घेतली होती. त्यांनी मला सांगितले होते की, जास्त काही करायची आवश्यकता नाहीये. जितकं जास्त होईल तितक्या शरीराच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न कर. मी चेंडूला खूप उशिरा खेळत होतो. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना मी या गोष्टीवर खूप मेहनत घेतली. याचे हे पण कारण असू शकते की, आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी दुबईमध्ये आयपीएल स्पर्धा खेळलो होतो.”
चूक सुधारणे गरजेचे होते
शॉ म्हणाला, “ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर मी गोंधळून गेलो होतो. माझी बॅट गलीच्या दिशेने खाली येत होती, परंतु मी आतापर्यंत अशाच धावा केल्या आहेत. मी ज्याप्रकारे बाद होत होतो, त्यानंतर मला माझी चूक सुधारणे गरजेचे होते. फलंदाजीवेळी सुरुवातीच्या हालचालींमध्ये समस्या होती. मी योग्यरित्या हालत नव्हतो. मला बॅट शरीराच्या जवळ ठेवायची होती, मी असे करत नव्हतो.”
मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षकांना दिले श्रेय
पृथ्वी शॉची चूक निदर्शनात आणून देण्यात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि फलंदाजी प्रशिक्षक यांनी त्याला मदत केली. शॉ म्हणाला,”रवी (रवी शास्त्री) सर आणि विक्रम (विक्रम राठोड) सर यांनी मला माझी चुकी निदर्शनात आणून दिली. मला त्या चुकिमागचे कारण शोधायचे होते. त्यानंतर मी नेटमध्ये जाऊन सरावाला सुरुवात केली. एक छोटी चूक होती जी मी करत होतो. ऍडलेड पिंक बॉल कसोटी सामन्यात मी ज्या प्रकारे बाद झालो, त्या २ चेंडूवर मी खरच चुकीचे खेळलो होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
गुरु तो गुरुच!! रहाणेच्या प्रशिक्षकांमुळे पृथ्वी शॉला गवसला फॉर्म, अवघ्या ५ दिवसांत केल्या सुधारणा
रवी शास्त्रींना आली ‘३६’च्या आकड्याची आठवण, ट्विट करत म्हणाले…
“तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो”