भारताचे माजी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांची जोडी क्रिकेट इतिहासातील एक यशस्वी सलामीवीरांची जोडी मानली जाते. भारतीय संघासाठी वनडे सामन्यांमध्ये नेहमीच सलामीला फलंदाजी करणाऱ्या या दोघांनी सातत्याने संघाला चांगली सुरुवात करून देण्याची भूमिका बजावली होती.
मात्र या जोडीतील सौरव गांगुली हा ज्यावेळी भारतीय संघात आल तेव्हा तो सलामीला नव्हे तर मधल्या फळीत फलंदाजी करत होता. मात्र त्यानंतर सचिन तेंडुलकरने दिलेल्या एका सल्ल्यामुळे गांगुली सलामीला फलंदाजी करण्यास आला आणि मग पुढे इतिहास घडला. खुद्द सौरव गांगुलीनेच नुकताच या घटनाक्रमाचा खुलासा केला आहे.
“…आणि मी उतरलो सलामीला”
रिपब्लिक बांगला या वृत्तपत्राला मुलाखत देताना गांगुली म्हणाला, “ज्यावेळी मी भारतीय संघात पदार्पण केले त्यावेळी मी मधल्या फळीत फलंदाजी करत असे. त्यादरम्यान सचिन माझ्याकडे आला आणि म्हणाला की आपल्याकडे सलामीसाठी कोणी उपलब्ध नाही. तू कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असतो, तर वनडेत सलामीला येशील का? मी त्याला हो म्हणालो आणि तिथून पुढे मग सलामीवीर म्हणून माझा प्रवास सुरु झाला.”
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांनी एकूण १३६ वेळा भारतीय संघासाठी एकत्र सलामीला फलंदाजी केली आहे. यात त्यांनी ४९.३२ च्या सरासरीने तब्बल ६६०९ धावा काढल्या आहेत. ज्यामध्ये २१ शतकी भागीदार्यांचा तर २३ अर्धशतकी भागीदार्यांचा समावेश आहे.
“अनपेक्षितपणे मिळाले कर्णधारपद”
गांगुलीने यावेळी आपल्याला कर्णधारपद कसे मिळाले, यामागचाही किस्सा उलगडला. २००० साली ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला कसोटी मालिकेत ०-३ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच तिरंगी वनडे मालिकेत १४ पैकी केवळ एक सामना जिंकण्यात भारताला यश आले होते. त्यामुळे भारतात आल्यावर त्यावेळचा कर्णधार सचिन तेंडुलकरने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
“मात्र सचिन आणि मी समवयस्क असल्याने मला कर्णधारपदाबाबत ऑफर येईल, असे मला वाटले नव्हते. पण सचिन स्वतः नेतृत्व करण्यासाठी अनुत्सुक असल्याने मला कर्णधारपदाबाबत विचारणा झाली आणि मी हो म्हणालो”, असा खुलासा यावेळी गांगुलीने केला. कर्णधारपद स्विकारल्यावर आपल्यावरील विश्वास गांगुलीने सार्थ देखील ठरवला होता. त्याने पुढील दशकात भारतीय संघाचे समर्थपणे नेतृत्व केले.
महत्वाच्या बातम्या:
रवी शास्त्रींना आली ३६च्या आकड्याची आठवण, ट्विट करत म्हणाले
गुरु तो गुरुच!! रहाणेच्या प्रशिक्षकांमुळे पृथ्वी शॉला गवसला फॉर्म, अवघ्या ५ दिवसांत केल्या सुधारणा
भारत विरुद्ध इंग्लंड संघातील टी२० सामन्यांचा असा आहे इतिहास, पाहा कोण ठरलंय वरचढ





