प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (१४ जानेवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पटना पायरेट्सला पराभूत करत सर्वांना चकित केले. तर, दिवसातील दुसऱ्या सामन्यात बेंगलोरने लाजवाब खेळ करून गुजरात जायंट्सला पाणी पाजले
बेंगलोर विरुद्ध गुजरात या दुसऱ्या सामन्यात पहिल्या मिनिटापासून जोरदार लढाई पाहायला मिळाली. दोन्ही संघ एकेका गुणासाठी संघर्ष करताना दिसले. गुजरातसाठी युवा राकेश व बेंगलोरसाठी कर्णधार पवन सेहरावतने सातत्याने गुण घेतले. पहिल्या हाफच्या अखेरीस बेंगलोरकडे २२-१७ अशी आघाडी होती. पवनने आपला झंझावात कायम राखत पहिल्या हाफमध्येच सुपर टेन पूर्ण केलेला.
दुसऱ्या हाफची सुरुवात गुजरातने अत्यंत आत्मविश्वासाने केली. दोन सुपर टॅकल करत त्यांनी गुणांतील अंतर कमी केले. त्यानंतर ते पवन सेहरावतला जवळपास पाच मिनिटे बाहेर ठेवण्यात यशस्वी ठरले. मात्र, ऑल आउट झाल्यानंतर पुनरागमन करताना पवनने संघाला पुन्हा आघाडीवर नेण्याचे काम केले. अत्यंत वेगवान झालेल्या या दुसऱ्या हाफमध्ये दोन मिनिटे शिल्लक असताना गुजरात ऑल आऊट झाल्याने बेंगलोरच्या विजयाचे दरवाजे खुले झाले. अखेरीस बेंगलोरने या सामन्यात गुजरातला ४६-३७ असे पराभूत केले.
तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने अव्वल स्थानी राहिलेल्या पटना पायरेट्सवर ३८-२८ असा मोठा विजय मिळवला. कर्णधार दीपक हूडा व अर्जुन देशवाल यांनी अपेक्षित कामगिरी करत जयपूरला विजयाच्या दिशेने नेले. दुसरीकडे, भरवशाच्या सचिन तंवरला अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे पटना संघाला पराभवास सामोरे जावे लागले. पटनासाठी प्रशांत कुमार व मोनू गोयत यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा संघ विजयापासून वंचित राहिला.