प्रो कबड्डीमध्ये १२ ऑक्टोबर रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियम येथे जयपूर पिंक पँथर्स आणि युपी योद्धा या दोन संघात सामना झाला. हा सामना जयपूर संघाचा या मोसमातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता. या सामन्यात जयपूर संघाचे पाठीराखे विजयाची अपेक्षा करत होते पण प्रत्यक्ष सामन्यात जे घडले ते जयपूरचे पाठीराखे विसरण्याचा प्रयन्त करतील.
प्रो कबड्डीमध्ये युपी योद्धा संघाचा तात्पुरता कर्णधार असणारा रिशांक देवाडीगा याने आपल्या कारकिर्दीत प्रथमच कर्णधार म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम केला. या सामन्यात खेळताना त्याने रेडींगमध्ये विक्रमी २८ गुणांची कमाई केली. एका सामन्यात रेडींगमध्ये सर्वाधिक २८ गुण मिळवण्याचा नवीन विक्रम आपल्या नावे केला आहे.
या सामन्यात त्याने २७ रेड केल्या त्यात त्याने २८ रेडींग गुण मिळवले. त्यात त्याने २३ टच गुण तर ५ बोनस गुण मिळवले.
या मोसमात पटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवाल भन्नाट लयीत होता. त्याने या मोसमात २० पेक्षा जास्त गुण मिळवले होते. त्यामुळे तो एका सामन्यात सर्वाधिक गुणांचा हा जुना विक्रम मोडेल अशी कबड्डी वर्तुळात चर्चा होती. परंतु रिशांकने जयपूर विरुद्धच्या सामन्यात उत्तम कामगिरी करत युपी संघाला विजय मिळवून दिला. त्याच बरोबर त्याने युपी संघाचा प्ले ऑफमध्ये स्थान बनवण्याचा मार्ग सुकर केला.
यदाकदाचित आपणाला माहिती नसेल तर-
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या मोसमात ४२व्या सामन्यात ११ ऑगस्ट २०१५ रोजी काशीलिंग अडकेने तेलुगू टायटन्स संघाविरुद्ध खेळताना २४ गुण मिळवले होते. सर्व गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. त्या दिवसापासून एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मिळवण्याचा विक्रम काशीलिंगच्या नावावर होता. त्यानंतर हा विक्रम २ वर्ष २ महिने आणि २ दिवस अबाधित होता.