जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात पटना पायरेट्स व बंगाल वॉरियर्स संघ भिडले. दोन मजबूत संघातील हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. अखेरीस पूर्ण वेळानंतर पटना संघाने ४४-३० असा विजय मिळवला.
आतापर्यंत दुखापतीमुळे या हंगामातील एकही सामना खेळू न शकलेला रिशांक देवाडिगा प्रथमच बंगालसाठी मैदानात उतरला. मात्र, त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. कर्णधार मनिंदर सिंग याच्या कामगिरीच्या जोरावर बंगालने पहिल्या हाफमध्ये २१-१६ अशी आघाडी घेतली.
सामन्याचा दुसरा हाफही रोमांचक राहिला. पटना संघाचा अनुभवी रेडर मोनू गोयतने या हाफवर एकतर्फी वर्चस्व राखले. त्याने सातत्याने गुण घेतले. पाच गुणांची एक रेड मारत संघाला सामन्यात पुढे नेले. यादरम्यान त्याने पीकेएल इतिहासात ५०० पॉईंट पूर्ण केले.