काल दिनांक २ऑगस्ट रोजी दुसरा सामना हा तेलगू टायटन्स आणि बेंगाल वॉरियर्स या संघात सामना झाला. हा सामना तेलगू टायटन्सने गमावला तर बंगालने आपल्या या वर्षीच्या कबड्डीच्या मोसमाची सुरुवात विजयाने केली.
या सामन्यात बंगालचे रेडर मणिंदर सिंग आणि जांग कुन ली यांनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला, तर तेलगू टायटन्स संघाला घरच्या मैदानावर सलग चौथ्या पराभवाला सामोर जावे लागले.
सामन्याच्या पहिल्या सत्रात पहिला गुण बंगालने मिळवला आणि गुणांचे खाते खोलले. त्यानंतर तेलगू संघाने गुणांचे खाते खोलले आणि चौथ्या मिनिटाला बढत ५-३ अशी केली. बंगालच्या मणिंदर सिंगने रेडींगमध्ये गुण वसूल करण्याचा धडाका लावला आणि १४व्या मिनिटातपर्यंत सामन्यात ११-१८ बढत मिळवली. पहिले सत्र संपले तेव्हा तेलगू टायटन्सचे १४ तर बेंगाल वॉरियसचे १९ गुण होते.
दुसऱ्या सत्रात बंगालच्या संघाने आपली बढत कायम राखण्याला प्राधान्य दिले आणि फक्त ‘डू ऑर डाय रेड’वर गुण मिळवण्याचे सुत्र अवलंबले. यामुळे तेलगू टायटन्स ३५व्या मिनिटापर्यंत २०-२६ इतकी जवळ होती आणि त्या नंतर विकासने एक सुंदर रेड करून सामना २२-२६ करून तेलगू टायटन्सला सामन्यात आणले पण शेवटी राहुलच्या आत्मघाती रेडमुळे तेलगू टायटन्स सामन्यात मागेच राहिली. पण बंगालचा डिफेन्स शेवटच्या काही मिनटात खूप चांगला खेळला आणि सामना बंगालने २४-३० असा जिंकला.