प्रो कबड्डी लीगचा (पीकेएल) 11वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्सनं मंगळवारी याची घोषणा केली.
पीकेएलचा 11वा हंगाम तीन शहरांमध्ये खेळला जाणार आहे. सीझनचा पहिला टप्पा 18 ऑक्टोबरपासून हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियमवर सुरू होईल. त्यानंतर दुसरा टप्पा नोएडा इनडोअर स्टेडियमवर 10 नोव्हेंबरपासून आणि तिसरा टप्पा 3 डिसेंबरपासून पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर खेळला जाईल.
लीगचे पूर्ण वेळापत्रक काही दिवसांनी जाहीर केलं जाईल. गेल्या महिन्यात पीकेएलचा लिलाव झाला, ज्यामध्ये विक्रमी आठ खेळाडूंवर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली लागली होती.
प्रो-कबड्डी लीग जुलै 2014 मध्ये सुरू झाली. नवनीत गौतमच्या नेतृत्वाखाली ‘जयपूर पिंक पँथर्स’ संघानं पहिल्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं होतं. दुसऱ्या सत्रात अनूप कुमारच्या नेतृत्वाखालील ‘यू मुंबा’ चॅम्पियन ठरली. ‘पटना पायरेट्स’नं तिसऱ्या हंगामात विजेतेपद पटकावलं. संघानं सलग 3 फायनल जिंकून विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली. बंगाल वॉरियर्स, बंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण यांनी प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद पटकावलंय. जयपूर पिंक पँथर्स दोनदा चॅम्पियन बनली आहे.
गेल्या हंगामात पुणेरी पलटणनं आपलं पहिलं विजेतेपद पटकावलं होतं. पुण्याच्या संघानं अंतिम फेरीत हरियाणा स्टीलर्सचा 28-25 अशा फरकानं पराभव केला. हा सामना हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळला गेला होता.
प्रो कबड्डी लीगचे विजेते
पहिला हंगाम – जयपूर पिंक पॅन्थर्स
दुसरा हंगाम – यू मुंबा
तिसरा हंगाम – पटना पायरट्स
चौथा हंगाम – पटना पायरट्स
पाचवा हंगाम – पटना पायरट्स
सहावा हंगाम – बंगळुरू बुल्स
सातवा हंगाम – बंगाल वॉरियर्स
आठवा हंगाम – दबंग दिल्ली
नववा हंगाम – जयपूर पिंक पॅन्थर्स
दहावा हंगाम – पुणेरी पलटण
हेही वाचा –
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?
विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आरसीबीनं रोहित शर्मावर बोली का लावावी? जाणून घ्या 3 मोठी कारणं