प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७० व्या सामन्यात बेंगलोर बुल्स व पुणेरी पलटण हे दोन संघ आमनेसामने आले. पवन सेहरावतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बेंगलोर संघासाठी मागील सामन्यातील दुर्दैवी पराभव विसरून पुढे जाण्याची संधी होती. मात्र, पुणे संघाने त्यांचे हे मनसुबे उधळून लावत विजय साजरा केला.
पहिल्या हाफच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकेका गुणासाठी झगडताना दिसले. पवन गुण मिळवण्यात यशस्वी ठरत असला तरी तो सातत्याने बाद होत होता. दुसरीकडे, पुणे संघासाठी युवा रेडर मोहित गोयत व अस्लम इनामदार चांगली कामगिरी करत होते. पहिल्या हाफच्या अखेरीस पुणे संघाकडे १४-१३ अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुन्हा एकदा पुणे संघाने पवनला बाद करण्यात यश मिळवले. त्यानंतर पुणे संघाने आपली आघाडी वाढवत ठेवली. मोहितने सलग दुसऱ्या सामन्यात आपला सुपर टेन पूर्ण केला. तसेच, डिफेन्समध्ये सोमबीर, करमवीर व संकेत सावंत यांनी उपयुक्त योगदान देत पुणे संघाची आघाडी कमी होऊ दिली नाही. अखेरच्या दोन मिनिटात पाच गुणांची मोठी आघाडी असताना पुणे संघाने पुन्हा एकदा हाराकिरी केली. बेंगलोरने सलग तीन गुण मिळवत सामना रोमहर्षक बनवला. अखेरच्या मिनिटात तब्बल चार रेड झाल्या. मात्र, संयम राखलेल्या पुणे संघाने ३७-३५ असा सामना जिंकला.